अनिल देशमुख काटोलमधून गायब : पुतण्याची टीका  - Anil Deshmukh Criticism of Ashish Deshmukh who disappeared from Katol  | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल देशमुख काटोलमधून गायब : पुतण्याची टीका 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

गृहमंत्री अनिल देशमुख आणि पुतणे काँग्रेस नेते आशिष देशमुख या काका-पुतण्यामधली वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची चिन्हं आहेत.

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि पुतणे काँग्रेस नेते आशिष देशमुख या काका-पुतण्यामधली वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची चिन्हं आहेत. गृहमंत्री काटोलमधून गायब असल्याची टीका आशिष देशमुखांनी केली आहे. 

अनिल देशमुख हे नागपुरातील काटोल या आपल्याच मतदारसंघातून गायब आहेत. त्यांच्यावर काटोलची जनता नाराज आहे. गेल्या सव्वा वर्षात कोणतीही कामं झालेली नाहीत, त्यामुळे मी सक्रिय व्हावं, अशी जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी होती” असं आशिष देशमुख म्हणाले आहेत. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी परवानगी घेऊन मंदिर, शाळेत क्लासेस घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

काटोलमध्ये विधानसभा मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्याचं सांगत आशिष देशमुखांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर्वच मतदारसंघात फिरतात, आगामी काळात काँग्रेस सत्तेत येणार, असा विश्वासही आशिष देशमुखांनी बोलून दाखवला. अनिल देशमुख औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतात, असा टोलाही त्यांनी काकांना लगावला आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोल मतदारसंघातून विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले अनिल देशमुख यांना त्यांनी पराभव केला होता. परंतु वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी 2018 मध्ये आमदारकी आणि भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये घरवापसी केली. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सोबत गुन्हेगारांचे फोटोसेशन...

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपुर्वी औरंगाबादचा दौरा केला. राज्यात महिला सुरक्षिततेसाठी होऊ घातलेल्या नव्या शक्ती कायद्या संदर्भात समितीची बैठक घेण्यासाठी ते शहरात आले होते. त्यांचा हा दौरा आता एका वेगळ्याच कारणाने वादात सापडलाय. सुभेदारी विश्रामगृहावर अनिल देशमुख यांच्या सोबत चक्क गुटखा किंग, बलात्काराचे आरोप असलेला व ट्रक चोरी करून त्याचे सुटे भाग विकल्याचा गुन्हा असलेले तीनजण फोटोत असल्याचे समोर आले आहे. खुद्द राज्याच्ये गृहमंत्रीच गुन्हेगारांसोबत फोटोमध्ये दिसत असल्याचे याची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

अनिल देशमुख यांच्या या दौऱ्या निमित्त त्यांना सुभेदारी विश्रामगृहात भेटणाऱ्यांची संख्या मोठी होती. यात पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा देखील समावेश होता. शहरातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने अनिल देशमुख यांची भेट घडवून आणत अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळवून दिली. पण या भेटीगाठी आणि फोटो सेशन मध्ये चक्क तडीपार, गुटखा किंग, बलात्काराचे आरोप व ट्रकचे सुटे भाग विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले गुन्हेगारही होते. या भेटीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली.

आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या व्हाईट काॅलर गुन्हेगारांची गृहमंत्र्यांशी भेट कुणी घालून दिली. पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी सुभेदारीवर उपस्थित असतांना कुणीच याची माहिती गृहमंत्र्यांना दिली नाही का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
 
Edited By - Amol Jaybhaye      
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख