फडणवीस दिल्लीला जाऊन बसले, तर मदत करू शकतात, पण ते पोलिस ठाण्यात गेले ः थोरात यांची टीका - If Fadnavis goes to Delhi, he can help, but he went to the police station: Thorat's criticism | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस दिल्लीला जाऊन बसले, तर मदत करू शकतात, पण ते पोलिस ठाण्यात गेले ः थोरात यांची टीका

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी रेमडेसिव्हीरचा साठा राज्याला मिळावा म्हणून प्रयत्न करायला हवा. परंतु तो भाजपचा कार्यकर्ता आहे, म्हणून त्यांना पाठिशी घालणे योग्य नाही.

मुंबई ः देेवेंद्र फडणविस दिल्लीला जाऊन बसले, तर मदत करू शकतात, पण दुर्दैव्याने ते पोलिस ठाण्यात जाऊन बसतात, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेमडेसिव्हीरच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

थोरात म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी रेमडेसिव्हीरचा साठा राज्याला मिळावा म्हणून प्रयत्न करायला हवा. परंतु तो भाजपचा कार्यकर्ता आहे, म्हणून त्यांना पाठिशी घालणे योग्य नाही. ही कंपनी गुजरातमध्ये काळाबाजार करताना पकडली गेली आहे. फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी सरकारला, जनतेला मदत करायला हवी.

थोरात म्हणाले, की आॅक्सिजनचा तुटवडा आहे, याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा सुरू आहे. विशाखापट्टणम येथून आॅक्सिजन येणार ही दिलासादायक गोष्ट आहे. सरकार जनतेसाठी सर्व प्रकारचे प्रय़त्न करीत आहे. जनतेनेही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जनता कर्फ्यू, लाॅकडाऊन आपोआप केला पाहिजे. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा समाचार घेताना थोरात म्हणाले, की मागणी कमी करा म्हणजे का, आॅक्सिजनची गरज आहे, हे गोयल समजू शकले नाहीत. ते महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करतात. रेल्वे तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग करून या मातीचे ऋण कसे फेडता येईल, हे त्यांनी पहावं.

 

हेही वाचा...

आरोग्यसुविधा उपलब्ध करून द्या : पिचड 

अकोले : तालुक्‍यात कोविडचा संसर्ग वाढत असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन बेड, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता तत्काळ करून देण्याची मागणी भाजपचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनही अत्यल्प स्वरूपात मिळत आहे. पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांत मात्र या सर्व सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येत आहेत. अकोले तालुका हा आदिवासी, डोंगराळ, अतिदुर्गम व पेसा क्षेत्रात असून, खेड्यापाड्यांमध्ये विखुरलेला आहे. ऑक्‍सिजन बेड, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता तत्काळ होण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत, अशी आग्रही विनंती पिचड यांनी केली आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख