डबेवाल्यांना मदतीचा हात : अवघ्या चार दिवसांत २० लाखांची देणगी - A helping hand to the boxers: a donation of Rs 20 lakh in just four days | Politics Marathi News - Sarkarnama

डबेवाल्यांना मदतीचा हात : अवघ्या चार दिवसांत २० लाखांची देणगी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

कोरोनामुळे हातावर काम असलेल्या अनेकांना प्रचंड आर्थिक ओढाताण करावी लागत आहे. मुंबईचे डबेवाले याला अपवाद नाहीत.

मुंबई : लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी आता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सहकारी डबेवाल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांत देणगीच्या माध्यमातून त्यांना २० लाख रुपयांची मदत मिलाप संस्थेमार्फत मिळाली आहे.

कोरोनामुळे हातावर काम असलेल्या अनेकांना प्रचंड आर्थिक ओढाताण करावी लागत आहे. मुंबईचे डबेवाले याला अपवाद नाहीत. वर्क फ्रॉम होम आणि कार्यालये बंद झाल्यामुळे हजारो डबेवाल्यांचे कामही थांबले आहे; पण अशा परिस्थितीत मिलाप या सामाजिक संस्थेने स्वतःहून पुढाकार घेऊन डबेवाल्यांचा आधार बनली आहे. मुंबई डब्बेवाले पुरवठा चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी मिलापद्वारे केलेल्या आवाहनाला तब्बल हजारो हातांनी मदत केली आहे.

मिलाप संस्थेने आमच्यासाठी मदतीचा मोठा हात दिला आहे. यातून सुमारे २० लाखांहून अधिक रक्कम मिळाली आहे. यामुळे खूप आशा आमच्या मनात निर्माण झाली असून, डबेवाल्यांना रेशन, औषधोपचार आदी आवश्यक खर्चासाठी आमच्या संस्थेमार्फत मदत करू शकतो, असे मुके यांनी सांगितले. या संसर्गात तीन डबेवाल्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबालाही साह्य करू, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारनेही डबेवाल्यांना आर्थिक साह्य करायला हवे. सरकारकडून आम्हाला मदतीचे आश्वासन मिळाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबईच्या डबेवाल्यांना उत्तम व्यावसायिक नियोजन असलेली साखळी म्हणून ओळखले जाते. देशात आणि परदेशात त्यांच्या कामाचे आणि परिश्रमाचे कौतुक केले जाते; मात्र आता शहर उपनगरात कार्यालये बंद आहेत. लोकल बंद आहेत. त्यामुळे आमची परिस्थिती बिकट होत चालली आहे, असे मुके म्हणाले. राज्य सरकारनेही दखल घेऊन आर्थिक साह्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.
 

हेही वाचा...

महाराष्ट्र शासनाने कलाकारांना मदतीचा हात पुढे करावा

नगर : कोरोना काळात चित्रपटातील कलाकार, सह्कलाकार तसेच लोक कलावंतांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या हाताला काम नाही. मागील वर्ष कुठलेही काम नसताना घराचे भाडे, बॅंक हप्ता,मु लांच्या शाळेच्या फी, लाईट बिल, किराणा, याचे अजुन पैसेही दिले नाही. आणि मनोरंजन क्षेत्र असल्याने सर्वात शेवटी सुरु होत होते. तोच पुन्हा लॉकडाउन. अशा वेळी सरकारने या कलावंतांच्या पाठिशी उभे राहून त्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन अभिनेते प्रशांत नेटके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.
        

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख