राज्यात वर्षभरात कोरोनाने 349 पोलिसांचा मृत्यू ! आतापर्यंत 32,317 जणांना लागण - Corona kills 349 policemen in state 32,317 people infected so far | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात वर्षभरात कोरोनाने 349 पोलिसांचा मृत्यू ! आतापर्यंत 32,317 जणांना लागण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. स्थानिक पातळीवर पोलिसांना विविध उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत.

मुंबई : कोरोनाच्या संकटाला एक वर्ष पूर्ण झाले असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलिस दलातील कोव्हिडयोद्धे आजही अहोरात्र झटत आहेत. या वर्षभरात राज्यभरातील 32 हजार 317 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, 3932 अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर राज्यातील 349 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा... सचिन वाझेसोबत त्या दिवशी महिला कोण होती

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. स्थानिक पातळीवर पोलिसांना विविध उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. विशेष करून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी वर्षभरात राज्यात तीन लाख 11 हजार 529 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर 73 कोटी 47 लाखांच्या दंडात्मक कारवाया केल्या आहेत. याशिवाय बेकायदा वाहन चालवणाऱ्या 1347 चालकांवर कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या 47,111 नागरिकांना अटक केली आहे, तर राज्यभरात 97,011 वाहने जप्त केली.

हेही वाचा... सुशांत खामकर नव्हे, सचिन वाझे

राज्य पोलिस दलातही आतापर्यंत 32,317 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यात 3932 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्य पोलिस दलात 1539 सक्रिय रुग्ण असून, त्यात 228 अधिकारी व 1311 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात वर्षभरात 30,429 पोलिसांनी कोरोनावर मात केली. त्यातील अनेक जण सेवेतही पुन्हा रुजू झाले आहेत; पण राज्यातील 349 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यात 31 अधिकारी व 318 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांवर हल्ल्याच्या 390 घटना

नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या 390 घटना राज्यभरात घडल्या आहेत. त्या प्रकरणांमध्ये 912 व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. समाजकंटकांच्या हल्ल्यामध्ये 90 पोलिस जखमी झाले आहेत, तर कोव्हिडयोद्धे असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत डॉक्‍टर, नर्स व कर्मचारी यांच्यावरही हल्ले झाले आहेत. त्यात 78 जण जखमी झाले आहेत. विलगीकरणाचे नियमभंग केल्याची 912 प्रकरणे समोर आली आहेत. त्यात मुंबईत घटलेल्या घटनांचा समावेश नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख