शरद पवारांचे उदाहरण देत अजितदादांची सुजय विखेंना शाब्दीक टोलेबाजी - Ajit Pawar criticizes Sujay Vikhe Patil over remdesivir injection | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांचे उदाहरण देत अजितदादांची सुजय विखेंना शाब्दीक टोलेबाजी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

सुजय विखे यांचं उदाहरण का दिलं, तर...

मुंबई : रेमडेसिव्हिर इंजेक्शनावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना फटकराताना संबंधित वैद्यकीय साहित्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे जमा करायला सांगितले आहे. त्यावरून विखे पाटील यांच्यावर टीका होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उदाहरण देत त्यांना शाब्दीक टोलेबाजी केली आहे. 

उपमुख्यमंत्री पवार हे मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत हेाते. त्या वेळी त्यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, खासदार सुजय विखे पाटील यांनी  परदेशातून आणलेली इंजेक्शन व इतर साहित्य सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. तुम्ही जरी लोकप्रतिनिधी असला तरी तुमच्या ओळखीने आणलेले साहित्य कोणत्या कंपनीचे आहे. ती लोकांना देण्याच्या योग्यतेचे आहेत का, त्याची तपासणी झाली आहे का, त्याला मान्यता मिळालेली आहे, या सर्व गोष्टी तपासून ही औषधे दिली जातात. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याही ओळखी आहेत. मधल्या काळात त्यांना कोणीही ही रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून दिली तर ते सांगायचे की पुणे, साताऱ्याला द्यायचे तर जिल्हाधिकाऱ्याकडे द्या किंवा मुंबईला द्यायची असतील तर महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे अथवा मुख्य सचिवांकडे द्या, असे ते सांगायचे. प्रशासनाकडून जी यंत्रणा राबवली जाते, त्यांच्यामार्फतच ही औषधं दिली पाहिजेत. त्यानंतर प्रशासनातील अधिकारी त्याची विभागणी करायचे. याची आठवण अजित पवार यांनी करून दिली.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, आता यांचे (सुजय विखे पाटील) विमानात बसलेले फोटो, ते बॉक्सेस वैगेरे मी पाहिले. पण, माझं म्हणणं आहे की त्याचा कोणी अतिरकेही करू नये. सत्ताधारी असो आता विरोधक प्रत्येकानी नियमांचे तंतोतंत पालन करून आणि ते रुग्णांना वापरायच्या योग्यतेचे आहे की नाही, याची शहनिशा करूनच पुढील निर्णय घेतलेले बरं. याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे.

सुजय विखे यांचं उदाहरण का दिलं, तर त्यांसदर्भातील त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आणि औरंगाबाद खंडपीठाने त्याबाबत आपलं मत व्यक्त केले. मी फक्त त्यांच्याबद्दलच बोलत नाही, तर सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असू अथवा विरोधी पक्षाचे असो. हे वेगळ्या महामारीचं संकट आहे, अशा वेळी प्रत्येकाने समंजस भूमिका घेतलेली जास्त चांगलं राहील, असेही अजित पवार यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख