मुख्यमंत्री ठाकरेंसोबत नीलम गोऱ्हेही सेनेतर्फे विधान परिषदेच्या पुन्हा आमदार होणार?

रिक्त झालेल्या जागांमध्ये भाजप 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 3, कॉंग्रेस 2 आणि शिवसेना 1 अशी संख्या आहे. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 29 मते आवश्‍यक आहेत. रिक्त झालेल्या जागांचा विचार करता तसेच सध्याचे विधानसभा सदस्यांचे संख्याबळ पाहता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून येण्याची संख्या अपक्षासह पुरेशी आहे.
neelam gorhe-thakcray
neelam gorhe-thakcray

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे आमदारकीबाबतच्या बहुचर्चित मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे कारण पुढे करीत लांबवलेल्या विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राजभवन ते राजधानी दिल्लीपर्यंत राजकीय चक्रे फिरवल्यावर ताबडतोब जाहीर झाला.

विधानसभा सदस्यांमधून निवडून येणाऱ्या या 9 जागांवर जोरदार रस्सीखेच होणार असून ही निवडणूक बिनविरोध होणार का? भाजप चौथा उमेदवार देणार का? याकडे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी पक्षाचा कल राहणार आहे.

रिक्त झालेल्या जागांमध्ये भाजप 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 3, कॉंग्रेस 2 आणि शिवसेना 1 अशी संख्या आहे. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 29 मते आवश्‍यक आहेत. रिक्त झालेल्या जागांचा विचार करता तसेच सध्याचे विधानसभा सदस्यांचे संख्याबळ पाहता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून येण्याची संख्या अपक्षासह पुरेशी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून काल-परवापर्यंत राजकीय रणकंदन सुरू होते. त्यावर आता पडदा पडला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवार मुख्यमंत्री ठाकरे हे उमेदवार असतील. कालावधी संपलेल्या शिवसेनेच्या एका जागेवर विधानसभेच्या उपसभापती आणि महिला प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवार म्हणून नीलम गोऱ्हे यांचेही नाव निश्‍चित मानले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तीन उमेदवार निवृत्त होत आसले तरी सध्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य 54 व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडून येतील तर कॉंग्रेसकडे 44 सदस्य आहेत. त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. अतिरिक्त मते कॉंग्रेसकडे आहेत. भाजपकडे 105 जागा असून काही अपक्षांचा त्यांना पाठींबा असल्यामुळे त्यांची संख्याबळ 114 आहे. भाजपचे तीन सदस्य निवडून येत आहेत. भाजपला चौथा सदस्य निवडून येण्यासाठी काही मते कमी पडतात. त्यामुळे भाजप या चौथ्या जागेवर उमेदवार देणार आहे का? याकडे सत्ताधारी महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडे घटक पक्ष, अपक्ष यासह 174 जागांचे बळ आहे. यामुळे महाविकास आघाडी सहावा उमेदवार देणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. शिवसेना आणी राष्ट्रवादी प्रत्येकी दोन, कॉंग्रेस एक असे पाच उमेदवार दिल्यानंतर सहाव्या जागेचा तिढा चर्चाअंती सोडवला जाणार असल्याचे समजते. तर भाजपने चौथा उमेदवार द्यायचा की नाही हे दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून ठरवणार आहे.

भाजपमधे रस्सीखेच
भाजपच्या तीन जागा जिंकून येण्याची खात्री आहे. यामुळे भाजपमधे तिकीटासाठी जोरदर रस्सीखेच आहे. यामधे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे,नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह विधानसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. तसेच प्रवक्ते माधव भांडारी, कोकणातून विनय नातू, प्रमोद जठार, पश्‍चिम महाराष्ट्रातून अलिकडेच भाजपमधे आलेले विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे चिरंजिव रणजितसिंह मोहिते, कराडचे अतुल भोसले यांची नावे चर्चेत आहेत.
--
कॉंग्रेस -राष्ट्रवादीमधे सामाजिक समतोल साधण्यवर भर
राष्ट्रवादी कॉंग्रेस -कॉंग्रेसमधे सामाजिक समतोल राखण्यावर आहे.आघाडीच्या उमेदवारांची निवड करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दाला महत्व राहणार आहे. राष्ट्रवादीत माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार राजन पाटील, शिवाजीराव गर्जे, अदिती नलावडे, सदाशिव पाटील आदींच्या नावांची चर्चा आहे. तर कॉंग्रेसमधून प्रवक्ते सचिन सावंत, माजी मंत्री नसिमखान, चारूलता टोकस, माणिकराव ठाकरे, चंद्रकांत पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com