महाजन डायसवर, आमदार कुटेंनी माईक खेचला : भास्कर जाधवांना धक्काबुक्कीचा आरोप - uproar in vidhansabah on obc reservation | Politics Marathi News - Sarkarnama

महाजन डायसवर, आमदार कुटेंनी माईक खेचला : भास्कर जाधवांना धक्काबुक्कीचा आरोप

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरून रणकंदन

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आज  विधानसभेत (Vidhansabha) जोरदार घोषणाबाजी झाली. या मुद्यावर बोलू न दिल्याच्या निषेधार्थ विरोधी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan), संजय कुटे (Sanjay Kute) यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर येऊन घोषणा दिल्या. आमदार कुटे यांनी अध्यक्षांसमोरचा माईक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी त्यांना दटावले आणि त्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले.

कामकाज तहकूब झाल्यानंतर कुटे यांनी अध्यक्षांच्या केबिनमध्ये भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. कुटे यांनी तो आरोप फेटाळला आणि गर्दीमुळे धक्का लागल्याचा दावा केला. आम्हाला सभागृहात बोलू न दिल्याने आपण आक्रमक झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र मलिक यांनी अशा आमदारांवर कारवाईचा इशारा दिला.  

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून केंद्राकडे डाटा मागण्याचा मुद्दा हा वादाचा ठरला. राज्य सरकारने मांडलेल्या या ठरावात केंद्राकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न असल्याचा भाजपचा आक्षेप होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेला ठराव नियम गुंडाळून मांडला असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. त्यावरूनच सभागृहात आक्रमक मुद्दे मांडण्यात येत होते.

छगन भुजबळ यांनी हे मुद्दे खोडून काढले. फडणवीस यांच्याही काळात केंद्र सरकारकेड डाटा मागण्यात आला होता. मात्र आम्ही मागितला तर त्यात चूक काय? केंद्र सरकारच्या योजनांसाठी हा डाटा वापरला जात आहे. तो आपल्याला मिळावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत जाऊ. 

भुजबळ यांनी मांडलेल्या मुद्यांना उत्तर द्यायची संधी मिळावी, अशी मागणी भाजपची होती. भुजबळ यांचे उत्तर संपल्यानंतर जाधव यांनी ठराव मंजुरीसाठी पुकारताच फडणवीस यांनी हेडफोन फेकून दिला. भाजप सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी अध्यक्षांसमोर धाव घेतली. गिरीश महाजन आणि संजय कुटे हे अधिक आक्रमक झाले. त्यांनी अध्यक्षांना चुकीचे करत असल्याबद्दल सुनावले. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनीही त्याच पद्धतीने त्यांना दटावले. या गोंधळात कुटे यांनी माईक खेचण्याचा प्रयत्न केला. जाधव यांनी ठराव मंजूर केल्याची घोषणा करत सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

सभागृहात आरक्षणाच्या मुद्दयांवर बोलू न दिल्याबद्दल विधान परिषदेतही गोंधळ झाला. विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणा दिल्या.

वाचा या बातम्या : आमदार सरनाईक विधानसभेत अवतरले आणि म्हणाले

सरकार जागे होण्यासाठी आणखी किती स्वप्नील हवेत?

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस व जाधव यांच्यात चकमक

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख