uddhav thackray changes three decisions in a week related to NCP leaders | Sarkarnama

उद्धव ठाकरेंनी आठवडाभरातच राष्ट्रवादीचे तीन निर्णय फिरवले!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 9 जुलै 2020

महाआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस आक्रमक राहील, असा सर्वांचा अंदाज होता. तसे घडलेही. मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी आपला वरचष्मा दाखवून दिला.  

पुणे : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून कसे आहेत, याचा अंदाज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मंडळींना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आला असावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे हे सौम्य प्रकृतीचे मानले जातात. पण हा समज दूर होईल, असे निर्णय़ त्यांनी सत्तेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीबाबत घेतले आहेत. यातील एक निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात होता. दुसरा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आणि नऊ जुलै रोजी घेतलेला निर्णय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघाशी निगडित होता. 

ठाकरे यांना पदाचा अनुभव नसल्याने काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे  अनुभवी मंत्री त्यांना `ओव्हर टेक` करतील, असे सुरवातीला बोलले जात होते. तसे काही दिवस घडलेही. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी आपला वरचष्मा निर्माण केला आहे. तो नेमका जुलेैमधील गेल्या चार-पाच दिवसांत. 

यातील पहिला निर्णय म्हणजे पोलिस खात्यातील बदल्यांचा. मुंबईतील दहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संमतीने पोलिस आयुक्तांनी केल्या. त्यानंतर तीनच दिवसांत या बदल्या रद्द करून संबंधितांना पुन्हा मूळ ठिकाणी जाण्याचा आदेश देण्यात आला. मुंबईतील बदल्यांबाबत शिवसेना संवेदनशील असणे स्वाभाविक होते. तसेच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मुख्यमंत्र्यांची संमती असणे आवश्यक होते. हा मुद्दा ठाकरेंनी उपस्थित केला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या बदल्यांवरील वादाचे वादळ शमले.

त्यानंतर दुसरा निर्णय हा राजकीय होता. पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून राज्यात खळबळ उडवून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्याने त्याचा वेगळा संदेश गेला. शिवसेनेने या विषयावर आग्रही भूमिका घेतली. दुसऱ्या पक्षात गेलेले नगरसेवक पुन्हा पाच दिवसांत शिवसेनेत आणण्यात ठाकरेंना यश मिळाले. अजित पवार यांनी याबाबत खुलासा करताना हे नगरसेवक अपक्ष होते, असे मला सांगितले होते. तसेच ते भाजपमध्ये निघाले होते म्हणून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण केल्यानंतरही शिवसेना ठाम राहिली. ज्या प्रमाणे पोलिस अधिकारी मूळ जागेवर गेले तसेच हे नगरसेवक मूळ पक्षात पाठविण्यात आले.

तिसरा निर्णय हा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघा संदर्भात होता. राज्य राखीव पोलिस दलातील पोलिस बल गट क्रमांक 19 हा जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे स्थापन करण्याऐवजी तो नगर जिल्ह्यातील जामखेड येथे स्थापन करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या 26 जून रोज ी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. जळगावचा प्रकल्प नगरमध्ये नेला म्हणून त्यावर टीकाही सुरू झाली होती. जळगावात शिवसेनेचा पालकमंत्री असल्याने भाजप नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांनी त्यावर टीका केली होती. मात्र जामखेड येथे हे केंद्र नेण्याचा निर्णय सरकारने परत फिरवला आणि आधी ठरल्यानुसार हतनूर-वरणगाव येथेच ही गट स्थापना करण्याचे निश्चित करण्यात आले. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तशी घोषणा करून शासन निर्णयपण जारी केला. राष्ट्रवादीने घेतलेले तीन निर्णय एकाच आठवड्यात फिरवण्याचा योगायोग यानिमित्त घडला.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख