Uddhav Thackeray vented his anger on Ajit Pawar and Anil Deshmukh? | Sarkarnama

उद्धव ठाकरेंनी अजितदादांवरील राग अनिल देशमुखांवर काढला? 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 6 जुलै 2020

काही असले तरी मुख्यमंत्री ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजितदादांना थेट शिंगावर घेऊ शकत नाही.

पुणे : राज्यातील आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असं समजण्याचं काही कारण नाही. सरकार आघाडीचं असू द्या किंवा युतीचं. मतभेद हे ठरलेलेच असतात. राष्ट्रवादीने पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडल्याने शिवसेना अस्वस्थ झाली आहे. त्यात राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्याचे मंत्री अनिल देशमुख यांच्या सल्ल्याने मुंबई पोलिस आयुक्तांनी दहा उपायुक्तांच्या बदल्या केल्या. या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. अजित पवार यांच्या शिवसेना फोडीला ते शिवसेनेने दिलेले उत्तर मानले जात आहे. अर्थात अजित पवार यांच्यावरील राग हा देशमुखांवर निघाल्याची चर्चा आहे. मं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेले काही निर्णय राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या पचनी पडलेले नाही. तशी नाराजी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलूनही दाखविली आणि मुख्यमंत्र्यांना मुंबईत लागू केलेली दोन किलोमीटच्या अटीचा निर्णय मागे घ्यावा लागला. जे राष्ट्रवादीचे तेच कॉंग्रेसचे. त्यांचीही सारखी किरकिर सुरूच असते. 

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सरकारवर कडाडून हल्ला करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कात्रीत सापडले की काय ? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेचे खासदार आणि आघाडीतील दूत संजय राऊत यांनी तर कालच ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लावल्या जात असल्याचा आरोप विरोधकांवर केला आहे. 

काही असले तरी मुख्यमंत्री ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजितदादांना थेट शिंगावर घेऊ शकत नाही. अनेकवेळा दादा सरकारच्या अडचणीत धावून जातात. मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात असेही चित्र पाहण्यास मिळाले आहे. मात्र दादांना थेट विरोध करण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला ते स्थगिती देत आहेत अशीही चर्चा आहे. 

राष्ट्रवादीचे मंत्री कसलेले आहेत. मग ते अजितदादा असोत आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा गृहमंत्री अनिल देशमुख. या सगळ्याच मंत्र्यांचा आपआपल्या मंत्रालयावर चांगली पकड आहे. गृहमंत्री देशमुख हे कोरोनाच्या संकटात आघाडीवर होते. त्यांनी काही उपायुक्तांच्या केलेल्या बदल्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती देऊन अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. आता अधिकाऱ्यांच्या बदल्यावरूनही विरोधक सरकारवर टीका करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने कारभार सुधारणार आहे का असा सवालही केला जात आहे. 

मुख्यमंत्री आपल्या अधिकारात काही निर्णय घेतात. शेवटी हे आघाडी सरकार आहे त्यामुळे तिन्ही पक्षाचे मंत्री ठरवून निर्णय घेत असतीलही. तरीही या निर्णयावरून आघाडीत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला थेट विरोध राष्ट्रवादीने केला आहे तर दुसरीकडे निर्णयप्रक्रियेत आम्हाला विश्वासात घेतले जात नाही म्हणून कॉंग्रेसचे मंत्रीही नाराज होते. 

त्यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेऊन तशी नाराजीही त्यांच्या कानावर घातली होती. मुख्यमंत्री ठाकरे हे अजितदादा किंवा कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांना थेट नाराज करण्याचे धोरण स्वीकारत नाहीत. पण, त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देतात. गृहमंत्रालयाला अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या आहेत. मात्र त्याला मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती देऊन राष्ट्रवादीला एकप्रकारे इशारा दिल्याचीही चर्चा आहे. या बदल्या करताना गृहमंत्रालयाने मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले नव्हते अशीही माहिती आहे. 

त्यातच नगरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीने स्वत:च्या पक्षात घेऊन शिवसेनाला धक्का दिला होता. या पक्षप्रवेशावरूनही शिवसेनेत नाराजी आहे. आघाडी सरकार असल्याने काही मर्यादा तिन्ही पक्षांनी घालून घ्यायला हव्यात असे शिवसेनेचे म्हणणे आहे. उद्या शिवसेनाही असेच करू शकते. त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नका असा निरोप शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचेही समजते. विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादीत खडाखडी सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख