'जीपीओ'च्या दुरुस्तीचा निधी परत द्या : गजानन कीर्तीकरांची मागणी - Shivsena MP Gajanan Kirtikar Demands GPO Return of Repairing Fund | Politics Marathi News - Sarkarnama

'जीपीओ'च्या दुरुस्तीचा निधी परत द्या : गजानन कीर्तीकरांची मागणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

शहरातील पोस्ट कार्यालयांच्या तसेच कर्मचारी वसाहतींच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून कीर्तीकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथील मुख्यालयात केंद्रीय पोस्ट खात्याचे सचिव प्रदिप्ता कुमार बिसोई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

मुंबई : फोर्ट येथील पोस्ट खात्याची पुरातन वास्तू म्हणून घोषित केलेली मुख्यालयाची जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) इमारत दुरुस्तीसाठी यावर्षी केंद्र सरकारने आठ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला होता. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारने तो परत मागून घेतला. जीपीओच्या दुरुस्तीसाठी तो पुन्हा तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी केली आहे. 

शहरातील पोस्ट कार्यालयांच्या तसेच कर्मचारी वसाहतींच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून कीर्तीकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथील मुख्यालयात केंद्रीय पोस्ट खात्याचे सचिव प्रदिप्ता कुमार बिसोई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांच्या यासंदर्भातील लेखी निवेदनात वरील माहिती देण्यात आली आहे. जीपीओ या फोर्ट येथील कलात्मक पुरातन वास्तूला दुरुस्तीची नितांत गरज असून त्याअभावी तेथे पावसाळ्यात गळतीही होते. त्यामुळे लोकांची व कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जीपीओ ला निधी तत्काळ द्यावा, अशी मागणीही कीर्तीकर यांनी केली. 

शहरातील पोस्ट खात्याच्या अनेक इमारती मोडकळीला आल्या आहेत, विशेष म्हणजे नव्याने बांधलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. अनेक इमारती तर खिळखिळ्या झाल्याने पाडाव्या लागल्या आहेत. तेथील पोस्ट सेवा तात्पुरत्या स्वरुपात अन्यत्र स्थलांतरित करण्यात आल्याने नागरिकांचेही प्रचंड हाल होत आहेत. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी वा पुनर्बांधणीसाठी वेळेवर निधी मिळत नसल्याने त्यासंदर्भात कीर्तीकर यांनी वरील मागणी केली.  

''अंधेरीच्या (पूर्व) सहार पोस्ट आणि टेलिग्राफ कॉलनीतील कर्मचारी वसाहतींच्या इमारतींच्या दुरुस्तीची गरज असल्याने त्यासाठी तीन कोटी रुपये द्यावेत. तसेच अंधेरीच्या पश्चिमेकडील वर्सोवा पोस्ट ऑफिसदेखील मोडकळीला आल्याने ते ऑफिस आझाद नगर येथे तात्पुरते स्थलांतरित केले आहे. त्यामुळे नागरिकांना सात आठ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आहे. हा त्रास टाळण्यासाठी वर्सोवा पोस्ट ऑफिसजवळील सेंट्रल फिशरीज इन्स्टीट्यूटमधील रिकाम्या असलेल्या चार सदनिका पोस्ट खात्याला द्यावात. किंवा अंधेरी पश्चिम येथील पोलिस कर्मचारी वसाहतीत रिक्त असलेल्या  चार सदनिका वर्सोवा पोस्ट ऑफिससाठी तात्पुरत्या स्वरुपात द्याव्यात," अशाही मागण्या कीर्तीकर यांनी केल्या. 

मत्स्यव्यवसाय विभागाकडे तसेच महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांकडे किंवा मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठपुरावा करावा, अशा मागण्याही कीर्तीकर यांनी यावेळी सचिव बिसोई यांच्याकडे केल्या. यासंदर्भात सकारात्मक भूमिकेतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन सचिवांनी दिले. वरील माहिती कीर्तीकर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख