School Curriculum to by Cut by Twenty Five Percent in Maharashtra | Sarkarnama

बारावीच्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाचा 'हा' नवा अध्यादेश

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जुलै 2020

कोरोनामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली होती.

मुंबई  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने शिक्षण ऑनलाईन सुरू केले आहे असले तरीही प्रत्यक्षात शाळा कधी सुरू करणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केल्याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे.

कोरोनामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली होती. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) व केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड यांनी जून महिन्यात दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात एक समान आशय असलेला भाग रद्द करावा, असा प्रस्ताव शिक्षण तज्ज्ञांनी सरकारसमोर मांडला आहे. 

त्यानुसार अभ्यासक्रमात कपात करून नवीन शैक्षणिक सत्रांचा २०२०-२०२१ चा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. केंद्राप्रमाणेच  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबतची तयारी सुरू केली आहे. विविध विषयांच्या अभ्यास मंडळ सदस्यांना त्यांनी अभ्यासक्रमात कपात करून द्यावी, असे सांगितले आहे. यानुसार अनेक अभ्यास मंडळांनी याबाबतचा आपला अहवाल परिषदेकडे सुपूर्द केला असून २५  टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यास शिक्षण विभागाने  परवानगी दिली आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी आपापल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी आणि शाळांना व पालकांना याबाबत माहिती द्यावी, अशी सूचना या अध्यादेशाद्वारे करण्यात आली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख