परळचे मैदान संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश - Row in BMC over Paral Ground | Politics Marathi News - Sarkarnama

परळचे मैदान संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

परळ परिसरात पालिका बांधत असलेले मैदान संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या उद्यानासाठी पालिकेने तयार केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा कंत्राटदाराने तब्बल 35 टक्के दराने काम करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे या अंदाजपत्रकाचीही चौकशी करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई : परळ परिसरात पालिका बांधत असलेले मैदान संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या उद्यानासाठी पालिकेने तयार केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा कंत्राटदाराने तब्बल 35 टक्के दराने काम करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे या अंदाजपत्रकाचीही चौकशी करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

परळ येथील राखीव भूखंडावर उद्यान तयार करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी तीन कोटी 70 लाख रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते; मात्र कंत्राटदाराने तब्बल 35 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली. तसा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. भाजपने या प्रस्तावावर आक्षेप घेत कंत्राटदार 35 टक्के कमी दराने काम करूच कसा शकतो, असा प्रश्‍न उपस्थित केला. 

कंत्राटदाराने दोन कोटी 42 लाखांत काम करण्याची तयारी दाखवली. त्यातील 83 लाख ही अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम आहे. म्हणजे प्रत्यक्षात एक कोटी 60 लाखांत हे काम होणार आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावरच भाजपने प्रश्‍न उपस्थित केला. कंत्राटदार कमी किमतीत दर्जेदार काम करू शकणार कसा, असा प्रश्‍न शिरसाट यांनी उपस्थित केला, तर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उद्यान विभागाच्या कामांवरच आक्षेप घेतला. उद्यान विभागाची कामे मंजूर होतात. प्रत्यक्षात कामे होतच नाहीत. अंदाजित रक्कम आणि प्रत्यक्ष कामाच्या खर्चात तफावत कशी असू शकेल, असे सांगत या अंदाजपत्रकाची दक्षता विभागाकडून चौकशीची मागणी केली.

मनुष्यबळ असल्यास खर्च कमी!
कामाचे दर ठरलेले असतात; मात्र कंत्राटदाराचे स्वतःचे मनुष्यबळ असल्यास खर्च कमी होतो. त्यामुळे निविदा कमी खर्चात भरल्या जातात, असा दावा अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांनी केला. दरांची फेरतपासणी करून कमी खर्चात काम कसे होऊ शकते, याची माहिती सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख