पोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली - Promotions of Police Havildars not done yet | Politics Marathi News - Sarkarnama

पोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली

वैदेही काणेकर
रविवार, 20 सप्टेंबर 2020

मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 318 पोलीस कर्मचाऱ्यांची उप निरीक्षक पदी पदोन्नती रखडली असून तत्काळ पदोन्नती करण्याची आवश्यकता असून याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविले आहे.

मुंबई : नि:शस्त्र पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अहंता परीक्षा- 2013 मधील पात्र असलेल्या उमेदवारांची उप निरीक्षक पदी पदोन्नती रखडली आहे. यात मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 318 पोलीस कर्मचाऱ्यांची उप निरीक्षक पदी पदोन्नती रखडली असून तत्काळ पदोन्नती करण्याची आवश्यकता असून याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृह मंत्री अनिल देशमुख, अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांस पाठविलेल्या पत्रात निवेदन दिले आहे. ''पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सन 2013 मध्ये खात्यामार्फत विभागीय अहर्ता परीक्षा पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतली होती या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती देण्यासाठी माहे जानेवारी 2019 मध्ये यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, या यादीप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली नाही,'' असे या निवेदनात म्हटले आहे.

''त्यानंतर शासनाने 875 पोलीस उपनिरीक्षक पदाची रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस महासंचालकांना माहे नोव्हेंबर 2019 मध्ये लेखी पत्र दिले होते या पत्रानुसार पोलिस महासंचालक कार्यालयाने पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करुन जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 318 पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती मागून त्यांचे विरुद्ध गुन्हे किंवा विभागीय चौकशी प्रलंबित आहे. तसेच संवर्गसाठी देखील माहिती मागविली होती,'' असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संदर्भातील आदेशानुसार शासनाने दिनांक 29/12/2017 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीमध्ये खुल्या वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी जे निकष लावले होते त्याप्रमाणे संपूर्ण माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडे उपलब्ध आहे तरी सुद्धा काही वरिष्ठ अधिका-यांनी यात खोडा घालण्याचा उद्देशाने नवीन पत्रव्यवहार केला, यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पोलीस आयुक्तालयातील 318 पोलीस हवालदार पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत यामध्ये टप्प्याटप्प्याने काही कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त देखील झाले आहेत.

एकीकडे राज्य सरकार नवीन पोलीस भरती बाबत घोषणा करत आहे पण दुसरीकडे पदोन्नतीच्या प्रतिक्षेतील हवालदारांना न्याय देताना दिसत नसल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख