Police Unearthed Illegal Telephone Exchange in Mumbai Govandi Area | Sarkarnama

धक्कायदायक : चिनी कंपन्यांच्या मदतीने मुंबईत सुरु होते बेकायदा टेलिफोन एक्सेंज

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

बेकायदा एक्‍स्चेंजच्या माध्यमातून परदेशातून आलेले अथवा व्हीओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) दूरध्वनी  वळवले जातात. सिम बॉक्‍स आणि इंटरनेटच्या मदतीने सर्व्हरच्या माध्यमातून असे  कॉल संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवले जातात.

मुंबई  : तीन चिनी कंपन्यांच्या मदतीने गोवंडी येथे एक बेकायदा टेलिफोन एक्‍सचेंज  सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाली आहे. हे एक्स्चेंज गेल्या आठ महिन्यांपासून सुरू होते. त्याच्या  माध्यमातून ३० लाख दूरध्वनी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारचा २० कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

समीर अलवारी (३८) याला बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दहशतवाद, आर्थिक गुन्हेगारी व अन्य सर्व बाजू विचारात घेऊन पोलिस या गंभीर प्रकरणाचा तपास करत आहेत. या आरोपींची माहिती जम्मू-काश्‍मीर पोलिस व लष्करी गुप्तचर विभागाला मिळाली होती. ही माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना तीन दिवसांपूर्वी देण्यात आली. त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी एका खासगी मोबाईल नेटवर्क कंपनीच्या मदतीने याचा तपास केला. तेव्हा गोवंडी परिसरातून हे दूरध्वनी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

त्यानंतर पोलिसांनी गोवंडी येथे छापा टाकला व  समीर अलवारी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल २२३ सिमकार्ड व पाच सिमबॉक्‍स हस्तगत करण्यात आले आहेत. आखाती देश व पाकिस्तानमधून या एक्स्चेंजच्या माध्यमातून दूरध्वनी करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. बेकायदा एक्‍स्चेंजच्या माध्यमातून परदेशातून आलेले अथवा व्हीओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) दूरध्वनी  वळवले जातात. सिम बॉक्‍स आणि इंटरनेटच्या मदतीने सर्व्हरच्या माध्यमातून असे  कॉल संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवले जातात. त्यामुळे अशा काॅल्सची नोंदही होत नाही. ज्याच्या क्रमांकावर हा काॅल जातो त्याला भारतीय मोबाईल क्रमांकावरुनच दूरध्वनी येत आहे, असे वाटते. 

हेरगिरीचीही शंका

पाकिस्तानी यंत्रणांनी या बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजचा वापर करून भारतीय लष्करी तळांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा कसे या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरु असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख