राज्यात अवैध बस वाहतुकीवरील कारवाई थंडच - No Effective Action on illegal Bus Travel in State | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात अवैध बस वाहतुकीवरील कारवाई थंडच

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 जून 2020

रोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर मुंबईसह राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक बंद आहे. मात्र, या काळात गुजरात आणि राजस्थानमधून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक सुरू होती. विना ई-पास, विनापरमिट बसगाड्या खासगी वाहतूकदार चालवत होते. प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते आणि प्रवाशांचीही जादा संख्येने वाहतूक केली जात होती

मुंबई  : गुजरात, राजस्थानमधील वाहनांतून महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर राज्य परिवहन आयुक्तांनी या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते; मात्र,  आतापर्यंत फक्त 178 बसगाड्यांची तपासणी झाली आहे. त्यापैकी केवळ 50 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ई-पास आणि परमिट नसलेल्या वाहनांची संख्या त्यात जास्त असल्याचे उघड झाले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर मुंबईसह राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक बंद आहे. मात्र, या काळात गुजरात आणि राजस्थानमधून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक सुरू होती. विना ई-पास, विनापरमिट बसगाड्या खासगी वाहतूकदार चालवत होते. प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते आणि प्रवाशांचीही जादा संख्येने वाहतूक केली जात होती. त्यावर कारवाई होत नसल्याने मुंबई मोटर वाहन संघटनेने अखेर स्वतःहून या वाहनांची धरपकड सुरू केली होती.

त्यामुळे परिवहन खात्यात गडबड उडाली. अवैध वाहतुकीबाबत.अनेक तक्रारी आल्यावर परिवहन आयुक्तांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करावी असे आदेश दिले. मात्र, राज्यासह सीमा तपासणी नाक्‍यांवर वाहनांच्या तपासणीचा केवळ देखावाच केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे परप्रांतीय अवैध प्रवासी वाहतूकदारांना वाचवण्यात येत आहे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

फक्त 25 वाहनांची तपासणी
राज्यातील सीमा तपासणी नाक्‍यांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी ट्रकचालक बनून आच्छाड सीमा तपासणी नाक्‍यावर छापा टाकला.  त्या वेळी नाक्यावर सुमारे 22 लाख रुपये अतिरिक्त आढळल्यामुळे ठाणे विभागाच्या आरटीओ अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली होती. राज्यातील 22 सीमा तपासणी नाक्‍यांवरून दिवसाला हजारो वाहनांची ये-जा असताना 15 जूनपासून फक्त 25 वाहनांची तपासणी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाई केली आहे. त्यामुळे सर्व मार्गांवरील अवैध प्रवासी वाहतूक बंद झाली आहे. असा दावा राज्य परिवहन विभागाचे उपायुक्क पुरुषोत्तम निकम यांनी केला आहे. 

मुंबई बसमालक संघटनेने गेल्या तीन दिवसांत सुमारे 175 वाहने पकडून दिली आहेत. अशा अनेक वाहनांना आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून समज देऊन सोडले आहे. मात्र, त्यामध्ये सर्वाधिक वाहने परप्रांतीय असल्याने आता जप्तीची कारवाई कशी करणार? हा प्रश्न आहे. नाशिकमधील पेठ सीमा तपासणी नाक्‍यावरून छुप्या मार्गाने अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे. - हर्ष कोटक, सरचिटणीस, मुंबई बसमालक संघंटना

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख