मुंबईत समुद्रकिनारी छटपूजेवर बंदी - No Chaat Pooja on Sea Shore this year | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत समुद्रकिनारी छटपूजेवर बंदी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

सालाबादप्रमाणे समुद्र आणि नदीकिनारी साजऱ्या होणाऱ्या छटपूजेवर यंदा मुंबई महापालिका प्रशासनाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा समुद्रकिनाऱ्यावर छटपूजा करण्यास बंदी असेल

मुंबई  : सालाबादप्रमाणे समुद्र आणि नदीकिनारी साजऱ्या होणाऱ्या छटपूजेवर यंदा मुंबई महापालिका प्रशासनाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा समुद्रकिनाऱ्यावर छटपूजा करण्यास बंदी असेल. त्याऐवजी कृत्रिम तलावात छटपूजा साजरी करावी, असे आदेश पालिकेने काढले आहेत. भाजपने मात्र पालिकेच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

उत्तर भारतीयांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेला छटपूजेचा उत्सव यंदा 20 आणि 21 नोव्हेंबरला साजरा होणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यांत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही छटपूजा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी जुहू किनाऱ्यावर दर वर्षी हजारो उत्तर भारतीयांची गर्दी होते. 

समुद्राच्या पाण्यात स्नान करून सूर्याला अर्घ्य देण्यासाठी शेकडो महिला छटपूजा करतात; मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने सुरक्षित अंतर व व्यक्तिगत आरोग्याची जबाबदारी म्हणून महापालिका प्रशासनाने उत्सवावर बंदी आणली आहे. कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्याची प्रथा रूढ होत आहे. त्याच धर्तीवर अशा तलावात छटपूजा साजरी करावी, असे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत. दरम्यान, पालिकेचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचा दावा करत भाजपने त्यास विरोध केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख