राज्यातील ९० डॉक्‍टरांचे राजीनामे; शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे संताप - Ninety Doctors from Maharashtra resigned due to Harrasement | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील ९० डॉक्‍टरांचे राजीनामे; शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे संताप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या मॅग्मो संघटनेने आरोग्यमंत्री तसेच आरोग्य विभागाला लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाला वाचा फोडली आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकारी कोरोनाविरोधात प्रमाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांकडून डॉक्‍टरांबरोबर अरेरावी करण्यात येते. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे म्हटले आहे

मुंबई : कोरोनाकाळात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्‍टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील ९० डॉक्‍टरांनी राजीनामे दिले आहेत. राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना अरेरावी तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने डॉक्‍टरांचे खच्चीकरणा होत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) आरोग्य विभागाला पत्र लिहून अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या मॅग्मो संघटनेने आरोग्यमंत्री तसेच आरोग्य विभागाला लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाला वाचा फोडली आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकारी कोरोनाविरोधात प्रमाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांकडून डॉक्‍टरांबरोबर अरेरावी करण्यात येते. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे म्हटले आहे. 

त्यामुळे डॉक्‍टरांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून राज्यभरातील ९० डॉक्‍टरांनी राजीनामे देऊन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. डॉक्‍टरांना होणाऱ्या त्रासाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न होतो; मात्र वरिष्ठ अधिकारी याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने डॉक्‍टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी मॅग्मो संघटनेने केली आहे; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; तसेच त्यासाठी जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा इशारा मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिला आहे. या विषयावर आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहितीही डॉ. गायकवाड यांनी दिली.

...तर जिल्हाधिकारी जबाबदार
डॉक्‍टरांना होणाऱ्या त्रासाबाबत राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यातून काही तरी तोडगा निघेल, असा विश्वास डॉ. राजेश गायकवाड यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य प्रतिसाद न दिल्यास त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख