खाडी, समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी महापालिकेस ३० कोटींचा दंड - NGT Fines Mumbai Corporation for Sea Pollution | Politics Marathi News - Sarkarnama

खाडी, समुद्र प्रदूषित केल्याप्रकरणी महापालिकेस ३० कोटींचा दंड

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

शहरातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करणे, सांडपाण्यातून घनकचरा, प्लास्टिक समुद्रात, खाडीत मिसळल्यामुळे पर्यावरणाची हानी झाल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने नुकताच मुंबई महापालिकेस २९.७५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंबई : शहरातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करणे, सांडपाण्यातून घनकचरा, प्लास्टिक समुद्रात, खाडीत मिसळल्यामुळे पर्यावरणाची हानी झाल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने नुकताच मुंबई महापालिकेस २९.७५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

वनशक्ती या पर्यावरण क्षेत्रातील संस्थेचे डी. स्टालिन यांनी २०१८ मध्ये राष्ट्रीय हरित लवादामध्ये या संदर्भात याचिका केली होती. शहरातून समुद्रात, खाडीत अनेक ठिकाणी प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण वाढल्याबद्दल ही याचिका होती. गेली दोन वर्षे याबाबत लवादाने विविध मुद्दे वेळोवेळी नोंदवले.तसेच विविध तज्ज्ञांच्या अहवालांचा त्यासाठी आधार घेण्यात आला.

शहरातून रोज समुद्रात सोडल्या जाणा ऱ्या सांडपाण्यापैकी २५ टक्के  पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचा व्हीजेटीआयच्या अहवालाचा आधार लवादाने घेतला. सांडपाणी समुद्रात सोडणा ऱ्या ८५ ठिकाणी पालिकेने पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करण्याची गरज नमूद केली. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला ४.२५ कोटी रुपयांचा दंड केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास भरण्याचा आदेश दिला आहे.  तसेच आतापर्यंत झालेल्या हानीबद्दल २९.७५ कोटी रुपयांचा दंड भरण्यासाठी लवादाच्या निर्णयापासून ३० दिवसांचा अवधी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख