Municipal Corporation Doctors luring Doctors by high Salaray | Sarkarnama

#CoronaEffect पालिकांकडून डॉक्‍टरांची चक्क पळवापळवी

भाग्यश्री भुवड
रविवार, 26 जुलै 2020

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे.  सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांसह या रुग्णांचे व्यवस्थापन होऊ शकेल. मात्र, डॉक्‍टरांनी नंतरही येथेच काम करावे म्हणून आम्ही डॉक्‍टरांना जास्त पगार देण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

मुंबई  : कोरोनाच्या साथीच्या काळात डॉक्‍टर आणि नर्सचा तुटवडा कायम जाणवत आहे. कोरोना संसर्गाचा धोका, त्यात कमी पगार या कारणांमुळे अनेक डॉक्‍टरांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या डॉक्‍टर, नर्सना जास्तीत जास्त पगाराची ऑफर देऊन आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न विविध पालिका प्रशासनांनी सुरू केला आहे. कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, यासाठी मुंबई महापालिका अधिकाधीक पगार देऊन डॉक्‍टर आणि परिचारिकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई महापालिका सध्या एमबीबीएस पदवीधरांना ८० हजार रुपये आणि एमडी आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांना दरमहा १ ते २ लाख रुपये पगार देते. आता नवी मुंबई महापालिकेने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात एमबीबीएस पदवीधारकांना १.२५  लाख रुपये  आणि एमडी पदवीधारकांना अडीच लाख रुपयांची ऑफर दिली गेली आहे.  दुसरीकडे ठाणे महापालिका 'एमडी' पदवीधारक डाॅक्टरांना अडीच लाख ते तीन लाख रुपयांची ऑफर देत आहे. त्यामुळे, मुंबईतील डॉक्‍टर्स येथे नोकरी करण्यासाठी धाव घेतील अशी भीती मुंबई महापालिकेला वाटायला लागली आहे.

पालिकेचे अनेक डॉक्‍टर व परिचारिका जास्तीच्या पगारासाठी ठाणे पालिका आणि नवी मुंबई पालिकेकडे जाण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे सावधगिरी म्हणून मुंबई पालिकेनेही  या डॉक्‍टरांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा विचार सुरु केला आहे. दरम्यान, ठाणे महापालिका डॉक्‍टर, नर्सना खासगी रुग्णालये, मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिकेपेक्षा जास्त पगाराची ऑफर देत आहे.

वाढत्या खाटांसाठी डाॅक्टर हवेत
नवी मुंबईत पालिकेने (एनएमसी) गेल्या आठवड्यात सिडको मैदानावरील १००० पैकी ५००  खाटांचे ऑक्‍सिजन खाटांमध्ये रुपांतर केले आहे. तसेच, नवीन कोविड केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेने तीन ते चार जागाही ठरवल्या आहेत. पुढील काळात नवी मुंबईत आणखी ५०० खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त बांगर यांनी दिली आहे.

याबाबत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, "टप्प्याटप्प्याने बेड्सची संख्या वाढवायची तर  अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज  भासेल. पगार कसे द्यावेत यावर विशेष अभ्यास करुन जाहिरातींचा आराखडा आम्ही तयार केला. १८  जुलै रोजी एनएमएमसीने डॉक्‍टर आणि परिचारिकांसाठी एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये एमबीबीएस डॉक्‍टरांना १.२५ लाख रुपये, परिचारिकांना सुमारे ४० हजार रुपये आणि एमडी तज्ज्ञांसाठी अडीच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. आम्ही सोमवारी मुलाखती घेण्यास सुरुवात केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही डाॅक्टरांना  नियुक्ती पत्र देण्यासही सुरुवात केली आहे,''

ठाणे पालिकेकडून सर्वाधिक ऑफर
आम्ही दररोज भुलतज्ज्ञ, एमबीबीएस डॉक्‍टर आणि परिचारिकांची भरती करायला सुरुवात केली आहे. नियुक्तीपत्र मिळालेल्यांपैकी ६० टक्के जण भरती झाले आहेत. ठाणे महापालिका तज्ज्ञ डॉक्‍टरांना सर्वाधिक दरमहा तीन लाख रुपयांची ऑफर देत आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली. तर, पालिकेत सोमवारी डॉक्‍टरांच्या वाढीव पगाराच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला जाणार, असल्याची माहिती पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ.आर.एन.भारमल यांनी दिली.

मुंबईला डाॅक्टर टिकवण्याचे आव्हान
मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे.  सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांसह या रुग्णांचे व्यवस्थापन होऊ शकेल. मात्र, डॉक्‍टरांनी नंतरही येथेच काम करावे म्हणून आम्ही डॉक्‍टरांना जास्त पगार देण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

राज्यातल्या परिचारिकांही पालिकांकडे आकर्षित
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि अंतर्गत भागातील अनेक परिचारिका ठाणे आणि नवी मुंबईत कामावर रुजू होत आहेत. मुंबईतही बऱ्याच परिचारिकांनी जास्त वेतनासाठी मार्च आणि एप्रिलमध्ये खासगी रुग्णालयातील नोकरी सोडून पालिका रुग्णालयात काम करायला सुरुवात केली आहे, असे युनायटेड नर्सेस असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख