MSRDC Will Do Documentation of Corona Fight | Sarkarnama

कोरोना लढ्याचे डाॅक्युमेंटेशन MSRDC करणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

भविष्यात कुठल्या रोगाची अशीच साथ आली तर त्याचा सामना करण्यासाठी कोरोना लढ्याचे डॉक्‍युमेंटेशन उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी राज्यातील कोरोना साथीच्या लढ्याचे डॉक्‍युमेंटेशन करावे, असा  निर्णय राज्याच्या महसूल व वन विभागाने घेतला आहे.

सोलापूर  : संपूर्ण कोरोनाचे संकट कोसळले आहे. भारतही त्यातून सुटलेला नाही. ही साथ आली त्यावेळी या रोगाचा मुकाबला करायचा कसा? असाच प्रश्न सर्व सत्ताधाऱ्यांसह प्रशासनालाही पडला होता. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक रोगांच्या साथी येऊन गेल्या. त्यावेळी या साथीच्या विरोधात प्रशासनाने कसा लढा दिला? याची माहितीच शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अचानक आलेल्या कोरोनाच्या विरोधात मुकाबला करताना शासनाला व प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि लागत आहे.  

कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी राज्य सरकारला, जिल्हा प्रशासनापुढे अनेक समस्यांचे डोंगर उभे होते.  भविष्यात कुठल्या रोगाची अशीच साथ आली तर त्याचा सामना करण्यासाठी कोरोना लढ्याचे डॉक्‍युमेंटेशन उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी राज्यातील कोरोना साथीच्या लढ्याचे डॉक्‍युमेंटेशन करावे, असा निर्णय राज्याच्या महसूल व वन विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर  हे डॉक्‍युमेंटेशन करण्याची जबाबदारी राज्याच्या महसूल विभागाने सोपविली आहे. 

या रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांवर या डाॅक्युमेंटेशनची जबाबदारी असेल. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी आपल्या अध्यक्षतेखाली कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक गट तयार करावा, अशा सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. 

विविध अधिकाऱ्यांशी साधणार संपर्क

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या कोरोना नियंत्रण कक्षाशी तसेच त्या व्यतिरिक्त वेळोवेळी स्वतंत्र आदेशान्वये नियुक्त केलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी हा गट संपर्क साधेल. या गटावर कोरोनाच्या लढ्यात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांबाबतच्या माहितीचे संकलन करण्याची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेली आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या मंत्रिगट, तज्ज्ञ समितीद्वारे करण्यात आलेल्या प्रयत्नाबाबतच्या माहितीचे संकलन हा गट करेल. 

थेट मुख्य सचीवांना देणार अहवाल

राज्यातील विविध प्रशासकीय विभागांना, क्षेत्रीय कार्यालयांना, सरकारी विभागांना भेटी देऊन तेथील कागदपत्रांचा अभ्यास करुन कोरोनाशी लढ्याबाबतची व्यवस्थितपणे मांडणी केली जाईल व त्याचे डॉक्‍युमेंटेशन केले जाईल. त्याकरिता या गटास आवश्‍यक ते सहकार्य अभिलेख संबंधित अधिकारी, प्रशासकीय विभाग, क्षेत्रीय कार्यालयाने उपलब्ध करून देण्याची सूचनाही महसूल विभागाने केली आहे. या डॉक्‍युमेंटशनसाठी येणारा सर्व खर्च महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या यांच्या माध्यमातून केला जाईल. या बाबतच्या कार्यवाहीचा अहवाल थेट मुख्य सचिवांना सादर करावा, अशी सूचनाही महसूल विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर रस्ते विकास महामंडळाला केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख