Maharashtra Government to take possession of Private Ambulances | Sarkarnama

खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा सरकारचा निर्णय

मिलिंद तांबे 
शुक्रवार, 26 जून 2020

खासगी रुग्णवाहिका चालकांकडून होणारी लूट राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांना मोफत सेवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई  : खासगी रुग्णवाहिका चालकांकडून होणारी लूट राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांना मोफत सेवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच जारी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात कोरोना संसर्ग वेगाने सुरु आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज वाढते आहे. अशा आणिबाणीच्या स्थितीत खासगी रुग्णवाहिका चालक लोकांकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल आकारत आहेत. मुंबईत अंतर्गत वाहतुकीसाठी १० हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत भाडे उकळले गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. या बाबतच्या तक्रारी दाखल आल्यानंतर राज्य सरकारने रुग्णवाहिकांबाबत नवीन धोरण आखले असून कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कोरोनाच्या साथीमुळे रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवत आहे. तो तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने खासगी रुग्णवाहिका गरजेनुसार ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात येतील. शहर किंवा जिल्ह्याच्या आवश्‍यकतेनुसार तेथील प्रशासनाला रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचे अधिकार दिले आहेत, असे आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी सांगितले.

सरकारी व ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णवाहिका कोरोनाबाधितांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्या रुग्णवाहिका शिल्लक राहतील त्या खासगी रुग्णवाहिकांची परिवहन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. परिवहन विभागाने ठरवून दिलेल्यापेक्षा अधिक दर या रुग्णवाहिका चालकांना आकारता येणार नाही. निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे घेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा परवाना रद्द केल जाणार असून, रुग्णवाहिका चालकांवर कडक कारवाई करणार असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती होणार उपलब्ध 
सर्व उपलब्ध रुग्णवाहिकांची माहिती आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात येईल. त्यासाठी १०८ क्रमांकाप्रमाणेच एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात येईल. त्यावर संपर्क करून कुणीही सर्वसामान्य रुग्ण, रुग्णवाहिकेची माहिती व उपलब्धता, स्थळ आणि लागणारा वेळ याची माहिती मिळवता येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्‍यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होणार असून, त्यांची फरपट व लूट थांबणार असल्याचा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख