विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीने वातावरण तापले : जाणून घ्या पक्षीय बलाबल

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेची ठरणार असल्याची चिन्हे
assembly session 2021
assembly session 2021

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या नुसत्या चर्चेनेच राजकीय धुरळा उठला आहे. विधीमंडळाचे अधिवेशन येत्या 5 व 6 जुलै रोजी होत आहे. याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड व्हावी, यासाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनीही ठाकरे सरकारला अध्यक्षपद निवडण्यासाठी पत्र पाठविल्याने भाजप या निवडणुकीत काही चमत्कार तर करणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा फेब्रुवारी 2020 मध्ये दिला आणि ते काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीच मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाहिले. आता काॅंग्रेसकडून संग्राम थोपटे, अमिन पटेल आणि सुरेश वरपुडकर यांच्या नावाची चर्चा आहे. 

या अधिवेशऩासाठी शिवसेना, भाजप आणि काॅंग्रेस यांनी आपापल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. सर्व आमदारांना उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपला चमत्काराची अपेक्षा असली तरी त्या आधी विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहणे औत्युक्याचे ठरेल.

महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर सेनेचा क्रमांक होता. पंढरपूर-मंगळेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होऊन तेथे भाजपचे समाधान अवताडे हे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या 105 वरून 106 झाली आहे. देगलूर येथे काॅंग्रेस आमदार अंतापूरकर यांच्या निधानाने जागा रिक्त आहे. त्यामुळे काॅंग्रेसची एक जागा कमी झाले आहे. 2019 च्या विधानसा निकालानंतर पक्षीय बलाबलात या व्यतिरिक्त फारसा फरक पडलेला नाही. विधानसभेतील पक्षनिहाय आमदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पंढरपूरच्या निकालानंतर मी करेक्ट कार्यक्रम करतो, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फडणवीस हे काही करणार का, याची उत्सुकता असल्याने ही निवडणूक चर्चेची ठरली आहे.

पक्षनिहाय आमदारांची संख्या 

  • शिवसेना- 56
  • राष्ट्रवादी काॅंग्रेस- 53
  • काॅंग्रेस- 43
  • भाजप-106
  • बहुजन विकास आघाडी-3
  • समाजवादी पक्ष-2
  • एमआयएम-2
  • प्रहार जनशक्ती-2
  • मनसे-1
  • सीपीएम-1
  • शेकाप-1
  • स्वाभिमानी -1
  • रासप-1
  • जनसुराज्य-1
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष-1
  • अपक्ष-13
  • रिक्त 1
  • (विधीमंडळाच्या वेबसाईटवरून)

महाविकास आघाडी सरकारने आपला विश्वासदर्शक ठराव हा 172 मते मिळवून मंजूर करून घेतला होता. त्यामुळे `मॅजिक फिगर`145 पेक्षा अधिक मते महाविकास आघाडीकडे सध्या तरी आहेत. काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मिळूनच संख्या ही 152 होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बहुमताबाबत निश्चिंत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com