ठाकरे सरकारने लावला मुनगंटीवारांच्या मागे चौकशीचा ससेमिरा : वृक्षलागवड चौकशीसाठी समिती जाहीर 

ही समिती चार महिन्यांच्या आतचौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करेल.
Legislative committee of 16 MLAs announced for inquiry into 33 crore tree planting campaign : Bharane
Legislative committee of 16 MLAs announced for inquiry into 33 crore tree planting campaign : Bharane

वालचंदनगर (जि. पुणे) : राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी 16 आमदारांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बुधवारी (ता. 10 मार्च) विधानसभेत केली. या समितीत भाजपचे चार आमदार आहेत. ही समिती चार महिन्यांच्या आत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करेल, अशी माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली. 

दरम्यान, वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी सुरू करून ठाकरे सरकारने तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

मागील फडणवीस सरकारने 2014 ते 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविली होती. या मोहिमेवर किती खर्च झाला व वृक्ष लागवडीनंतर किती झाडांचे संगोपन झाले. यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

या मोहिमे अंतर्गत वन विभागाने 28 कोटी वृक्षांची लागवड केली. त्यातील 75 टक्के रोपे सध्या जिवंत असून 25 टक्के रोपे नष्ट झाल्याचे सरकारने विधीमंडळात मान्य केले होते. राज्यातील अनेक भागातील रोपे नष्ट झाली आहेत. जी झाडे आहेत, त्याची व्यवस्थित देखभाल व संगोपन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

वृक्ष लागवड मोहिमेवर 2500 कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती. 

राज्यमंत्री भरणे यांनी विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा केली होती. तसेच, चार ते सहा महिन्यांत याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिल्यानंतर आठच दिवसांत राज्यमंत्री भरणे यांनी विधीमंडळ सदस्यांची समिती स्थापन करून ही समिती चार महिन्यांच्या आत सभागृहाला अहवाल सादर करेल, अशी घोषणा बुधवारी केली. या समितीमध्ये सर्वपक्षीय 16 आमदारांचा समावेश असल्याची माहिती भरणे यांनी दिली. 

समितीमधील 16 आमदारांची नावे 

वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेच्या 16 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मंत्री भरणे यांच्यासह नाना पटोले (कॉंग्रेस), सुनील प्रभू (शिवसेना), उदयसिंग राजपूत (शिवसेना), बालाजी किणीवर (शिवसेना), अशोक पवार (राष्ट्रवादी) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी), सुनील भुसारा (राष्ट्रवादी), शेखर निकम (राष्ट्रवादी), सुभाष धोटे (कॉंग्रेस), अमित झनक (कॉंग्रेस), संग्राम थोपटे (कॉंग्रेस), आशिष शेलार (भाजप), नीतेश राणे (भाजप), अतुल भातखळकर (भाजप), समीर कुणावर (भाजप) आणि नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) आदींचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com