कामगार-कर्मचाऱ्यांचे आधारवड र. ग. कर्णिक यांचे निधन

त्यांनी 1970 व 1977 मध्ये केलेले मोठे संप त्यांच्या लढ्याला महत्त्वपूर्ण वळण देणारे ठरले.
Labor leader R. G. Karnik passed away
Labor leader R. G. Karnik passed away

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत लढा देऊन त्यांना ते मिळवून देणारे झुंजार कामगार-कर्मचारी नेते रमाकांत गणेश ऊर्फ र. ग. कर्णिक (वय 91) यांचे शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे लाखो सरकारी कर्मचारी पोरके झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वेतन आयोगाचे फायदे व महागाई भत्त्यासह अन्य लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यात कर्णिक यांचा मोठा वाटा होता. केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लाभ ज्या तारखेपासून दिले, तेव्हापासूनच राज्याच्या कर्मचाऱ्यांनाही ते लाभ मिळावेत, ही मुख्य मागणीही त्यांनी मान्य करून घेतली. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी दुःख व्यक्त केले. 

राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे 52 वर्षे सरचिटणीस राहिलेल्या कर्णिक व संघटनेचे उपाध्यक्ष बापू कापडणीस यांची जोडी त्या काळात कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय होती. त्यांनी एकत्र अनेक आंदोलने करून कर्मचाऱ्यांना हक्क मिळवून दिले. या प्रदीर्घ काळात त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांना कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. संघटनेचे किमान 17 लाख सदस्य राज्यभरात आहेत. राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती, वेतन श्रेणी, सोयी-सुविधा यासंदर्भात संघटनेच्या दडपणामुळेच सतत सुधारणा होत गेल्या, त्याचे मोठे श्रेय कर्णिक यांना जाते. 

रमाकांत गणेश कर्णिक हे र. ग. कर्णिक या नावानेच ओळखले जात होते. सरकारी कर्मचारी संघटना आणि कर्णिक हे जणू काही समानार्थी शब्दच मंत्रालय आणि राज्य कर्मचारी क्षेत्रात रूढ झाले होते. एवढे कर्णिक हे सरकारी कर्मचारी-कामगार संघटनेशी एकरूप झाले होते. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे तब्बल 52 वर्षे सरचिटणीस राहिलेल्या कर्णिक यांनी कामगारांचे हित हेच आपले ध्येय मानले होते. त्यासाठी संघटना बळकट करून प्रशासनाकडे, सरकारकडे दाद मागणे, मागण्या धसास लावण्यासाठी न्यायालयात जाण्यापासून आंदोलने संपाचे हत्यार उगारणे या सर्व मागण्यांचा वापर करून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यांनी 1970 व 1977 मध्ये केलेले मोठे संप त्यांच्या लढ्याला महत्त्वपूर्ण वळण देणारे ठरले. 

मार्गदर्शकाची भूमिकाही निभावली 

केवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपुरतेच मर्यादित न राहता आपल्या अनुभवाचा फायदा देशभरातील कर्मचाऱ्यांना आणि सर्वच नागरिकांना व्हावा, यासाठी कर्णिक यांनी शेवटी मार्गदर्शकाची भूमिकाही स्वीकारली. कामगार संघटना कृती समितीचे (महाराष्ट्र) ते निमंत्रक होते. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून तसेच महाराष्ट्र सरकारी कर्मचारी संघटनांच्या कॉन्फेडरेशनवरही त्यांनी काम केले. नुकत्याच केंद्राच्या कामगार कायद्यांना विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या कामगार संघटना कृती समितीचेही (महाराष्ट्र) ते निमंत्रक होते. 

र. ग. कर्णिक यांना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा 2019 चा गं. द. आंबेकर जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला होता. कृती समितीचे सहनिमंत्रक विश्‍वास उटगी, मुंबई चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे रवींद्र गड्डम, नर्सेस फेडरेशनच्या कविता ठोंबरे, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघ तसेच आमदार निवास कर्मचारी संघटनेचे शशिकांत सकपाळ आदींनी कर्णिक यांना श्रद्धांजली वाहिली. 

चळवळीत समाजभान जोपासणारा नेता : उद्धव ठाकरे 

कामगार चळवळीत न्याय्य हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखणे महत्त्वाचे असते, असा संवेदनशीलतेचा धडा घालून देणारा नेता हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी र. ग. कर्णिक यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्राला चळवळींचा इतिहास आहे. यात कामगार-कर्मचारी चळवळीचा इतिहास लिहिताना कर्णिक यांच्या कर्मचारी संघटनेच्या उभारणीची दखल निश्‍चितच घेतली जाईल. संघटनेची वाटचालही महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशी राहील, असे काम त्यांनी केले. 
 

कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज हरपला : अजित पवार 

ज्येष्ठ कामगार नेते र. ग. कर्णिक यांच्या निधनामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज, राज्याच्या कामगार चळवळीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले. कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई लढताना, जनतेप्रती असलेल्या जबाबदारीचेही त्यांना भान होते. राज्य कर्मचाऱ्यांचे अलोट प्रेम, अतूट विश्‍वास लाभलेले ते कामगार नेते होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस म्हणून कर्णिक यांनी 52 वर्षे काम केले. संघर्ष करायचा; परंतु तुटेपर्यंत ताणायचे नाही, याचा विसर त्यांना कधी पडला नाही, असेही पवार म्हणाले. 
 
चळवळीसाठी आयुष्य वेचणारा सच्चा कार्यकर्ता हरपला : भुजबळ 
र. ग. कर्णिक यांच्या निधनाने प्रामाणिक, निस्वार्थ भावनेने कामगारांसाठी आयुष्य वेचणारा सच्चा कार्यकर्ता हरपल्याची शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्‍त केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे त्यांनी सलग पन्नासहून जास्त वर्षे समर्थपणे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला 54 दिवसांचा संप हा कामगार चळवळीतील प्रमुख टप्पा आहे. या ज्येष्ठ कामगार नेत्याच्या निधनाने फक्त कामगार चळवळीचीच नाही तर राजकीय व सामाजिक क्षेत्राचीदेखील मोठी हानी झाली आहे, असेही भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. 
 
कामगारांचा आदर्शदीप हरपला : सचिन अहिर 

कामगार नेते र. ग. कर्णिक यांच्या निधनाने कामगार चळवळीपुढील आदर्शदीप हरपला, अशा शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी श्रद्धांजली वाहिली. 

स्मारक उभारावे : गोविंदराव मोहिते 

र. ग. कर्णिक यांनी सुमारे सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांना संघटित करुन, त्यांना न्याय मिळवून दिला. वयाच्या नव्वद वर्षांपर्यंत ते कामगारांच्या हितासाठी निष्ठेने लढत राहिले. आपल्या कामातून त्यांनी संपूर्ण देशाच्या कामगार चळवळीपुढे नवा आदर्श निर्माण केला. कर्णिक हे राज्य कर्मचाऱ्यांचे आधारवड होते. त्यांची स्मृती कायम राहावी यासाठी सरकारने त्यांचे स्मारक उभारावे, अशा शब्दांत संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी श्रद्धांजली वाहिली. 
 

पर्व अस्ताला गेले : अविनाश दौंड 

राज्यातील लक्षावधी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या ऐतिहासिक नेतृत्वाचा अस्त झाला आहे. र. ग. कर्णिक यांचे कार्य यापुढेही असेच चालू ठेवले पाहिजे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी श्रद्धांजली वाहिली. 

आधारस्तंभ हरपला : जयप्रकाश छाजेड 

र. ग. कर्णिक हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने सरकारी कर्मचारी व महाराष्ट्रातील कामगार चळवळीने ज्येष्ठ मार्गदर्शक, नेता गमावला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी श्रद्धांजली वाहिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com