मुख्यमंत्री निधीबाबत माहिती देण्यास नकार

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस भरीव आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे; मात्र यास राजकीय पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळाला, याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता राजकीय पक्षाच्या योगदानाची माहिती देण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री निधीबाबत माहिती देण्यास नकार
Right to Information

मुंबई : राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री सहायता निधीस केलेल्या आर्थिक मदतीबाबत माहिती देण्यास मुख्यमंत्री सहायता कक्षाने नकार दिला आहे. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस भरीव आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे; मात्र यास राजकीय पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळाला, याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता राजकीय पक्षाच्या योगदानाची माहिती देण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत १५ मे रोजी माहिती मागितली होती; मात्र त्रयस्थ पक्षाच्या खाजगी बाबीत कोणी हस्तक्षेप करू शकेल, अशी वैयक्तिक माहिती देता येणार नसल्याचे त्यांना जन माहिती अधिकारी मिलिंद काबाडी यांनी कळविले आहे. यासोबतच अशा प्रकारची माहिती संकलित केली जात नाही. तसेच, या कामासाठी मोठ्या प्रमाणात साधन सामुग्री वळवावी लागेल, असेही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीत रोज अशा प्रकारचे व्यवहार होत असून विवरणपत्रात युटीआर(UTR )क्रमांकानुसार माहिती असते. 

त्यामुळे देणगीदारांची नावे शोधणे शक्‍य नाही, असे गलगली यांनी सांगितले आहे. याविरोधात गलगली यांनी १ जून २०२० रोजी प्रथम अपील दाखल केले होते. त्यावर ९ नोव्हेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली; मात्र या सुनावणीतही सहायक संचालक असलेल्या प्रथम अपिलीय अधिकारी सुभाष नागप यांनी कुठलाही दिलासा दिला नाही.

कोव्हिड अंतर्गत राजकीय पक्षांनी दिलेल्या आर्थिक मदतीबाबत पंतप्रधान सहायता निधी कक्षासोबतच राज्यातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडूनही माहिती दिली जात नाही. - अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in