Four Maharashtra Minister to get New Cars From Government | Sarkarnama

आर्थिक संकट असतानाही चार मंत्र्यांना मिळणार नव्या मोटारी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार २० लाख रुपयांच्या आत वाहनखरेदी करण्याची परवानगी आहे. मात्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २२ लाख किमतीची इनोव्हा क्रिस्टा ही गाडी खरेदी केली. ही गाडी मुंबईतील मधुबन मोटर्सकडून घेण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे

मुंबई  : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र शासनाने चार मंत्र्यांसाठी वाहन खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा मंत्री सुनील केदार आणि त्या खात्याच्या राज्यमंत्री आदिती तटकरे हे चार मंत्री यांना नव्या मोटारी मिळणार आहेत. अर्थमंत्री व  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष सूचनेनुसार ही परवानगी दिल्याचे समजते.

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार २० लाख रुपयांच्या आत वाहनखरेदी करण्याची परवानगी आहे. मात्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २२ लाख किमतीची इनोव्हा क्रिस्टा ही गाडी खरेदी केली. ही गाडी मुंबईतील मधुबन मोटर्सकडून घेण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. याच आदेशात अन्य तीन मंत्री, अप्पर मुख्य सचिव आणि कर्मचाऱ्यांसाठी वाहनखरेदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनामुळे आर्थिक ताण असतानाही ही खरेदी का, असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.

वाहन नसल्याचे कारण
दरम्यान, मंत्रिमहोदयांसाठी विभागाकडे गाडी नसल्याने अपरिहार्यता म्हणून ही खरेदी झाल्याचे वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. युती सरकारच्या काळात शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे हे खासगी वाहन वापरत असत. वर्षा गायकवाड आजवर खासगी वाहन वापरत होत्या. मात्र आता ते शक्‍य नसल्याने ही खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. क्रीडा खाते सांभाळणाऱ्या सुनील केदार यांना दुग्ध विकास खात्याचे वाहन मिळाले असल्याने किंवा ते व्यक्तिगत वाहन वापरत असल्याने खरेदीची गरज पडली नसावी, असे सांगण्यात येत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख