Don't Puchase Chinese Medical Equipments BJP to BMC | Sarkarnama

चिनी साहित्य घेऊ नका; भाजपची मुंबई महापालिकेकडे मागणी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जून 2020

चीनच्या विस्तारवादाला उत्तर म्हणून महापालिकेने चीनकडून कुठलीही वैद्यकीय उपकरणेही न घेता ती भारतीय कंपन्यांकडूनच घ्यावीत, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.

मुंबई  : चीनच्या विस्तारवादाला उत्तर म्हणून महापालिकेने चीनकडून कुठलीही वैद्यकीय उपकरणेही न घेता ती भारतीय कंपन्यांकडूनच घ्यावीत, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. दुसरीकडे चिनी उत्पादने ई- कॉमर्स कंपन्यांनीही  हटवावीत, अशी मागणी भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांनी केली आहे.

इतकी वर्षे आपण चिनी वस्तू विकत घेत होतो. मात्र, आता चीनला धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेने चिनी कंपन्यांकडून कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणे विकत घेतली आहेत. वास्तविक ही उपकरणे भारतीय कंपन्यांकडूनही घेता येणे शक्य होते. पण आता तरी 'मेक इन इंडिया' मोहिमेला बळ देण्यासाठी महापालिकेने चिनी कंपन्यांकडून कोणतेही वैद्यकीय साहित्य विकत घेऊ नये. मुंबई महापालिकेने गेल्या १५ दिवसांत चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द करुन  पुन्हा निविदा मागवाव्यात व ती कामे भारतीय कंपन्यांना द्यावीत,  असेही साटम यांनी महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

भारतीय उत्पादनांची विक्री करा

चिनी बनावटीच्या साहित्याची विक्री ई- कॉमर्स संकेतस्थळांवरून प्रामुख्याने होते.  या संकेतस्थळांनी चिनी वस्तूंची विक्री बंद करावी व  फक्त भारतीय उत्पादनांचीच विक्री करावी, अशी विनंती भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांनी नऊ ई-कॉमर्स कंपन्यांना पत्राद्वारे केली आहे. चिनी वस्तू खरेदी न करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख