पोलिस कर्मचारी नाही तर पोलिस अंमलदार म्हणा; महासंचालकांचे आदेश - DGP Maharashtra issues orders about Police designation | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस कर्मचारी नाही तर पोलिस अंमलदार म्हणा; महासंचालकांचे आदेश

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कनिष्ठ पोलिसांना आता पोलिस कर्मचारी असे न संबोधता त्यांना पोलिस अंमलदार म्हणण्यात यावे, असे आदेश राज्य पोलिस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत

मुंबई  : नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कनिष्ठ पोलिसांना आता पोलिस कर्मचारी असे न संबोधता त्यांना पोलिस अंमलदार म्हणण्यात यावे, असे आदेश राज्य पोलिस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. पोलिस शिपाईपासून ते सहायक पोलिस उपनिरीक्षकासाठी पोलिस अंमलदार असा शब्दप्रयोग करावा. आदेश, कार्यालयीन कागदपत्रांमध्ये अंमलदार असाच उल्लेख करण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

हे परिपत्रक राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालये तसेच जिल्हा अधीक्षक आणि पोलिस दलातील विविध विभागांना पाठवण्यात आले आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयातून दसऱ्याच्या मुहूर्तावर अशा प्रकारचे पोलिस पत्रक काढल्याने राज्यातील पोलिस दलात आनंदाचे वातवारण आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी वर्ग हा स्वतः प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून सर्वोत्कृष्ट कामगिरी पार पाडत असतो; मात्र त्यातही त्यांना पोलिस कर्मचारी असे संबोधले जाते; मात्र आता कर्मचारी अथवा अंमलदार शब्दप्रयोगच योग्य असल्याच्या भावना काही पोलिसांनी व्यक्त केल्या आहेत.

कनिष्ठ वर्गात होती नाराजी
राज्य पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यालादेखील पोलिस कर्मचारी असे संबोधले जात असल्याने पोलिस दलातील कनिष्ठ वर्गात सातत्याने नाराजी होती. तसेच ही नाराजी वेळोवेळी या कनिष्ठ वर्गाने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती; मात्र आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी स्वतः लक्ष घालत ही बाब पोलिस महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार पोलिस महासंचालकांनी राज्यातील पोलिस शिपायापासून ते सहायक पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस अंमलदार संबोधण्यात यावे अशा प्रकारचे परिपत्रक काढले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख