Deputy Sanpanch in Maharashtra will also get Honorarium Announces Hassan Mushriff | Sarkarnama

उपसरपंचांसाठी खूषखबर; त्यांनाही मिळणार मानधन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 जून 2020

गावखेड्यांच्या विकासांमध्ये सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन देण्यात आले नव्हते. या संदर्भातील प्रक्रिया आता पार पडली आहे. या प्रक्रियेनंतर आठ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले

मुंबई  : राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांसाठी एक खूषखबर आहे, कारण सरपंचांबरोबर आता त्यांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे. आजपर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते. उपसरपंचांचा मात्र त्यात समावेश नव्हता. पण आता उपसरपंचांनाही मानधन सुरू केले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

गावखेड्यांच्या विकासांमध्ये सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन देण्यात आले नव्हते. या संदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया आता पार पडली आहे. या प्रक्रियेनंतर आठ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात आले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशीही माहितीही मुश्रीफ यांनी दिली.

अशी असेल मानधनाची रक्कम 
ज्या गावांची २००० पर्यंत लोकसंख्या असेल त्या गावांच्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये, तर २००१ पासून आठ हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये आणि ८००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या उपसरपंचांना दरमहा दोन हजार रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.

सरपंचांचेही प्रलंबित मानधन अदा
राज्यातील सरपंचांचे काही महिन्यांचे मानधनही प्रलंबित होते. ते मानधन तातडीने देण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच एकूण २२ कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख