ठाकरेंपाठोपाठ अजितदादाही बनले चालक! 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर प्रत्येक मिटिंग आणि विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरतानाही स्वतःच गाडी चालविताना संपूर्ण राज्याने पाहिले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शनिवारी बारामतीत स्वतःच गाडी चालवत विकास कामांची पाहणी केली.
ठाकरेंपाठोपाठ अजितदादाही बनले चालक! 
Ajit Pawar drive the car himself

बारामती ः नेत्यांच्या गाडीत बसण्यासाठी एरवी स्पर्धा असते. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या नेतेमंडळी स्वतःच गाडी चालवत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना सध्या नेत्यांच्या गाडीत नो एन्ट्री आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर प्रत्येक मिटिंग आणि विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरतानाही स्वतःच गाडी चालविताना संपूर्ण राज्याने पाहिले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शनिवारी बारामतीत स्वतःच गाडी चालवत विकास कामांची पाहणी केली. 

कोरोना विषाणुमुळे अनेक समीकरणे बदलताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळातही कोरोनाने अनेक आमुलाग्र बदल घडवून आणल्याचे जाणवते. शारीरिक अंतर राखण्याचे सूत्र असल्यामुळे एरवी कार्यकर्ते व लोकांच्या गराड्यात असलेले नेतेही कमालीची काळजी घेताना दिसून येत आहेत. स्वतःची काळजी हा तर त्यात मुद्दा असतोच, पण सभोवताली जमलेल्या गर्दीचीही बातमी होऊ नये, यासाठी सर्वच जण काळजी घेताना दिसत आहेत. 

नेत्यांच्या गाडीत बसण्यासाठी एरवी स्पर्धा असते, स्वतःचे राजकीय महत्व वाढवून घेण्यासाठी किंवा एखाद्याचे महत्व वाढविण्यासाठीही महत्वाच्या नेत्यांच्या गाडीत कार्यकर्त्यांची रेटारेटी असते. अनेकदा नेत्यांच्या गाडीत बसण्यावरून वादाचेही प्रसंग उदभवतात. गेल्या दोन महिन्यात मात्र हे चित्रही बदलून गेले आहे. कोरोना विषाणूमुळे नेत्यांनाही आता अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागत आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही अशीच काळजी घेतली जात आहे. मास्क, हॅंड ग्लोव्हजच्या वापरासह सातत्याने सॅनेटायझेशन करणे, शारीरिक अंतर राखणे अशा अनेक बाबी आपल्या व्यस्त कार्यक्रमातही ते पाळताना दिसत आहेत. 

बारामतीत शनिवारी विकासकामांची पाहणी करताना अजित पवार यांनी स्वतःच आपल्या गाडीचे सारथ्य केले. त्यांच्याकडे असलेली टोयाटो लॅंड क्रूझर गाडी स्वतः चालवत त्यांनी विकास कामांची माहिती घेतली. विशेष म्हणजे आज त्यांच्या गाडीत स्वतः अजित पवार एकटेच होते. गाडीत बसण्याची संधी आज कोणालाही मिळाली नाही. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याच्या उद्देशानेच सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यातूनच आज अजित पवार यांनी बारामती शहरात चारचाकी गाडी स्वतः चालवत विकास कामांची ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली. अत्यंत सफाईदारपणे गाडी चालविण्याचे कौशल्य पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in