वीज खंडीत प्रकरणाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - CM Uddhav Thackeray Orders Grid Failure Issue | Politics Marathi News - Sarkarnama

वीज खंडीत प्रकरणाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी उर्जामंत्र्यांशीही चर्चा केली आहे.

आज सकाळी दहाच्या सुमारास ग्रीड फेल्युअरमुळे मुंबई-ठाणे येथील बहुतांश भागात वीज गेली आहे. त्यामुळे नागरिकांना- विद्यार्थ्यांना आणि रुग्णालयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आॅनलाईन शिक्षण सुरु असल्याने विद्यार्थांना वीजेअभावी बसून रहावे लागत आहे. दरम्यान, हे पूर्णपणे ठाकरे सरकारचे अपयश असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर हा वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत होईल, असा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

उर्जामंत्र्यांशी केली चर्चा

आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नागरिकांसमोर अडचणी

दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या . या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले  उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले.

दरम्यान, महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा - पडघा जीआयएस केंद्रात सर्किट देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी सर्व भार सर्किट दोन वर टाकलेला होता. पण त्यात बिघाड झाल्याने मुंबई - ठाण्यातील बहुतांश भागातील वीज गेली आहे, आमचे कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल, असा दावा राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. 
Editd By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख