CM salutes Corona warriors, appeals to win the war not by arms but by service | Sarkarnama

संकटकाळात महाराष्ट्र मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. :उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे.

मुंबई: महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोरोना योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. प्रत्येक कोरोना योद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. 

मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात तो मागे हटत नाही.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. 

या युद्ध संकटात एक ‘सैनिक’ बनून आपण कोरोना योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. ही एक प्रकारे देश आणि देवपूजाच आहे. ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रजू झाल्याशिवाय राहणार नाही. 

महाराष्ट्रात २१ हजार जणांचे अर्ज 
परिचारिका, औषध विक्रेते, डॉक्टर, स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, पॅरामेडिक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञानक्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील लोक अशा विविध क्षेत्रातून मुंबईसह महाराष्ट्रात २१ हजार ७५२ लोकांनी कोरोना योद्धे होण्यासाठी अर्ज केले आहेत. 

यात वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांची संख्या १२ हजार १०३ आहे. इतर क्षेत्रातील संख्या ९ हजार ६४९ यात ३ हजार ७१६ कोरोना योद्ध्यांनी रेड झोनमध्ये काम करण्याची तयारी दर्शविली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख