BMC to Paste Stickers on Free Hearse Cars | Sarkarnama

मुंबई पालिकेच्या मोफत शववाहिन्यांवर लावणार स्टीकर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सुरुवातीला नातेवाईकांच्या शव नेण्याच्या अडचणी कमी झाल्याने अनेकांनी या सेवेचे कौतुकही केले होते; मात्र ही सेवा मोफत असूनही जुलै महिन्यापासून या शववाहिन्यांचे चालक पैसे घेत असल्याच्या तक्रारी नायर रुग्णालयाकडेही आल्या. त्यावर नायर रुग्णालयाने नामी तोडगा काढत माहितीचे स्टिकर या रुग्णवाहिन्यांवर लावण्याचे काम सुरू केले आहे.

मुंबई  : कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर शववाहिन्या मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेने मुख्य पालिका रुग्णालयांमध्ये प्रत्येकी सहा शववहिन्या दिल्या आहेत; तरीही वाहनचालक रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. त्यामुळे नातेवाईकांची लूट थांबविण्यासाठी नायर रुग्णालयाने पुढाकार घेत आपल्या सर्व शववाहिन्यांवर माहितीचे स्टिकर चिटकवले आहेत.

स्टिकरमुळे रुग्णाच्या नातेवाईकांना ही सेवा मोफत असल्याचे समजणार आहे. तसेच चालकही पैसे मागू शकणार नसल्याने नातेवाईकांची लूट थांबणार आहे. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सुरुवातीला मृतदेह नेण्यासाठी शववाहिन्या मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे पालिकेने मुख्य म्हणजेच नायर, सायन आणि केईएम रुग्णालयासाठी प्रत्येकी सहा शववाहिन्या दिल्या होत्या.

सुरुवातीला नातेवाईकांच्या शव नेण्याच्या अडचणी कमी झाल्याने अनेकांनी या सेवेचे कौतुकही केले होते; मात्र ही सेवा मोफत असूनही जुलै महिन्यापासून या शववाहिन्यांचे चालक पैसे घेत असल्याच्या तक्रारी नायर रुग्णालयाकडेही आल्या. त्यावर नायर रुग्णालयाने नामी तोडगा काढत माहितीचे स्टिकर या रुग्णवाहिन्यांवर लावण्याचे काम सुरू केले आहे.

सुविधा मोफत
पालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये ही शववाहिनी सुविधा मोफत आहे. त्याद्वारे मुंबई महापालिका क्षेत्रातील मृतांचे शव स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्यात येते. असे असले तरी मृताच्या नातेवाईकांनी जवळच्या स्मशानभूमीचा पर्याय निवडावा. त्यामुळे इतरांना शववहिनीसाठी अधिक वाट पाहावी लागणार नाही, असे पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख