पालिकेतील भ्रष्टाचाराला फ्लडगेट लावा; भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांना टोला - BJP Mla Atul Bhatkhalkar Taunts CM over Flooding of Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

पालिकेतील भ्रष्टाचाराला फ्लडगेट लावा; भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे कोरोनाच्या काळात केव्हाही उपनगरांमध्ये फिरकले नाहीत. आज पावसामुळे मुंबईच्या उपनगरांमधील जनतेची काय अवस्था झाली आहे, ते पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्युनिअर ठाकरेंना उपनगरात पाठवले तर बरे होईल, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून फ्लडगेट व मोठे पंप बसवले. त्याचप्रमाणे त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराला फ्लडगेट व पंप बसवले असते तर आज मुंबई गळाभर पाण्यात बुडली नसती, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे कोरोनाच्या काळात केव्हाही उपनगरांमध्ये फिरकले नाहीत. आज पावसामुळे मुंबईच्या उपनगरांमधील जनतेची काय अवस्था झाली आहे, ते पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्युनिअर ठाकरेंना उपनगरात पाठवले तर बरे होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

''काल पहाटे पडलेल्या जोरदार पावसाने मुंबईतील बहुसंख्य ठिकाणी दोन ते चार फूट पाणी तुंबले होते. सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. मागीलवर्षी वांद्रे येथील कलानगर परिसरात पाणी तुंबले होते. त्यावरून काही लोकप्रतिनिधींनी महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचेही किस्से तेव्हा चर्चिले गेले होते. आता तेथे पाणी साचू नये म्हणून गेल्या सहा महिन्यांत तेथे एक हजार वॅट क्षमतेचे अठरा पंप लावले तसेच वांद्रे खाडीजवळ फ्लडगेटही लावली. त्यामुळे मातोश्री व कलानगर शंभर टक्के सुरक्षित झाले. पण मुंबईकर जनता तुंबलेल्या पाण्यामुळे पुन्हा एकदा त्रस्त झाली,'' अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडियोही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

''मुख्यमंत्री महोदय तुम्ही सुरक्षित झालात पण मुंबईकर जनता मात्र आज घरात शिरलेले पाणी बाहेर फेकण्यासाठी धडपड करते आहे. मुंबईकर अजूनही सुरक्षित नाहीत, मुंबईकरांना अशी धडपड प्रत्येक पावसाळ्यात किमान तीन-चार वेळा करावीच लागते. तुम्ही तुमच्या घरासाठी व कलानगरसाठी फ्लडगेट लावलेत पण त्याचवेळी महापालिकेतील भ्रष्टाचाराचे फ्लडगेट मात्र सताड उघडे ठेवलेत. पालिकेतील भ्रष्टाचाराला अजूनही फ्लडगेट लावलेत तर मुंबई वाचू शकते. मुंबईकरांची आजची दयनीय अवस्था पाहण्यासाठी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना उपनगरांमध्ये पाठवावे, अशी विनंती मी आपल्याला सामान्य नागरिकांच्या वतीने करीत आहे,'' असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख