१५ मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलेच नाहीत - BEST Didn't Send Electricity Bills to Fifteen Minister | Politics Marathi News - Sarkarnama

१५ मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलेच नाहीत

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

बेस्टच्या विद्युत उपक्रमाकडून लॉकडाउनचा काही कालावधी उलटल्यानंर वीज बिलांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात ग्राहकांना जादा बिले आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या. त्यावरून गोंधळ निर्माण झालेला असतानाच बेस्टकडून राज्याचे मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बिले न पाठविल्याचे समोर आले आहे

मुंबई : बेस्टच्या उपक्रमाने लॉकडाउनचा आधार घेत राज्याच्या काही मंत्र्यांच्या बंगल्यांवर काही महिन्यांची वीज बिले न पाठविल्याचा प्रकार उघड झाला आहे. बेस्टच्या विद्युत उपक्रमाकडून दर महिन्याला वीजग्राहकांना बिले पाठविली जातात. लॉकडाउनमध्ये सर्वसामान्य वीजग्राहकांकडून जादा बिले आकारण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी उद्भवल्या. परंतु, तशीच तत्परता मंत्र्यांच्या बंगल्यांबाबत का दाखविण्यात आली नाही, असा प्रश्न माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या उत्तरानंतर निर्माण झाला आहे. 

बेस्टच्या विद्युत उपक्रमाकडून लॉकडाउनचा काही कालावधी उलटल्यानंर वीज बिलांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात ग्राहकांना जादा बिले आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या. त्यावरून गोंधळ निर्माण झालेला असतानाच बेस्टकडून राज्याचे मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बिले न पाठविल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राज्यातील मंत्री, राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर वीज बिले पाठविण्यात आल्याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै अशा चार महिन्यांच्या कालावधीतील तपशिल मागितला होता.

त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागास करोना साथीमुळे ही बिले मिळालेली नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. १५ पैकी पाच मंत्र्यांच्या बंगल्याची मागील पाच महिन्याची बिले प्राप्त झालेली नाहीत. दादा भुसे, के. सी. पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ, संजय राठोड यांच्या बंगल्याचा समावेश आहेत. तर ज्या १० मंत्र्यांच्या बंगल्यांची गेल्या चार महिन्यांची बिले मिळालेली नाहीत, त्यात आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब, बाळासाहेब पाटील यांच्या बंगल्याचा समावेश आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख