Big Breaking अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा - Anil Deshmukh Resigns from Home Minister Post | Politics Marathi News - Sarkarnama

Big Breaking अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी तूर्तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. Anil Deshmukh Resigns from Home Minister Post

याबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, "देशमुख यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटून राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याला पवार यांनी संमती दिली. अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपानंतर आम्ही निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली होती. पण त्यानंतर न्यायालयाने आजचा निर्णय दिला." देशमुखांवर झालेल्या आरोपांबाबत काहीही तथ्य नाही. पण नैतिक मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला आहे, असे मलिक यांनी सांगितले. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच देशमुख राजीनामा देण्यासाठी गेले. काही वेळापूर्वी शरद पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयने (CBI) प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. मुंबईच्या अॅड. जयश्री पाटील यांनी न्यायालयात देशमुख तसेच वाझे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी रिट याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला. सीबीआयने येत्या १५ दिवसांत चौकशी करुन न्यायालयाला अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात चौकशी करावी, सध्या गुन्हा दाखल करु नये किंवा जयश्री पाटील यांची तक्रारही नोंदवून घेऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. Anil Deshmukh Resigns from Home Minister Post

दरम्यान, देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते , "शरद पवार यांच्या कडे आता सर्वांच्या नजरा लागतील.

कारण कोर्टाच्या निर्णयानंतर आता ते काय निर्णय घेणार? हा प्रश्न आहे. कारण पक्षप्रमुख म्हणून त्यांना निर्णय घ्यावा लागेल. राज्यात एवढा गंभीर विषय झाला असला तरी मुख्यमंत्री काही बोलत नाहीत, हे मुख्यमंत्र्यांच्या पदाला शोभत नाही.मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय दिला आहे.सीबीआय ला १५ दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हप्ता वसुलीचे काम त्यांच्या आशिर्वादाने होत होते. आता नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा. आता ही राजकिय मागणी राहिलेली नाही. कारण उच्च न्यायालयाने यामध्ये महत्त्वपूर्ण असे निर्देश दिले आहेत,'' असे फडणवीस म्हणाले होते. Anil Deshmukh Resigns from Home Minister Post

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले याचे आम्ही स्वागत करतो. अनिल देशमुख यांची ताबडतोब मंत्रीमंडळातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली होती.
Edited By- Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख