मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज दुपारी मातोश्री येथे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधले.
उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. गेल्या काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर सामाजिक विषयांवर खूप आक्रमक भूमीका मांडत आहेत. महाराष्ट्र, मुंबई यावरही त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेण्याचा विचार केला गेला.
ऊर्मिला यांनी कॉंग्रेसमधून २०१९ मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी दिलेल्या लढतीचे कौतुक होत होते; मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच पाठिंबा मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. निवडणुकीनंतर त्या कॉंग्रेसपासून लांब होत्या. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना आणि बॉलीवूडसोबत पंगा घेतला होता. त्यामुळे तिला थेट प्रत्युत्तर देणाऱ्या ऊर्मिला मातोंडकर एकमेव बॉलीवूड अभिनेत्री होत्या. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून ऊर्मिला यांचे नाव सुचवले. तसेच यापूर्वी ऊर्मिला आणि ठाकरे यांच्यात चर्चाही झाली होती. तेव्हापासून त्या शिवसेनेत प्रवेश कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Edited By - Amit Golwalkar

