मुंबईच्या महापौरांच्या विरुद्ध भाजपाचा अविश्वास प्रस्ताव दाखल - No Confidence Motion against Mumbai Mayor by BJP | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईच्या महापौरांच्या विरुद्ध भाजपाचा अविश्वास प्रस्ताव दाखल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

गेल्या सहा महिन्यांपासून कोविड महामारीचा सामना करण्यात मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाला अपयश आल्याचा आरोप भाजपाने केलाय. या अपयशाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जबाबदार असून त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव भाजपाने मांडला आहे

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून कोविड महामारीचा सामना करण्यात मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाला अपयश आल्याचा आरोप भाजपाने केलाय. या अपयशाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जबाबदार असून त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव भाजपाने मांडला आहे.

मुंबई महानगरपालिका १८८८ च्या कलम ३६ ( ह) अन्वये हा प्रस्ताव दाखल करण्यात आलाय. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सदस्य प्रभाकर शिंदे, ज्योती अळवणी, कमलेश यादव आणि ॲड. मकरंद नार्वेकर या नगरसेवकांच्या गटाने हा अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि स्थायी समिती सदस्य प्रभाकर शिंदे यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या गैरव्यवहाराचा पाढा वाचला.

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या, चिंताजनक मृत्यूदर आणि यानंतर पीसीआर चाचण्या वाढविण्यात पालिकेला अपयश आलंय. मुंबईतील कोरोना संक्रमन दर हा देशात सर्वात जास्त १८ टक्के आहे. वांद्रे बिकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये हा दर ३७ टक्के आहे. पालिकेने फेस मास्क, सॅनिटायझर आणि फेस शिल्डची चढल्या भावाने खरेदी केलीय असा आरोपही श्री. शिंदे यांनी केला.

महापौरांकडून गैरव्यवहाराची पाठराखण
गेल्या सहा महिन्यांत पालिकेची एकही सभा झालेली नाही. महापौर किशोरीताई पेडणेकर यांची सभा न घेण्यास संमती आहे. आरोग्य समिती सारख्या महत्वाच्या समितीची ही बैठक कोविड महामारीच्या सहा महिन्यांच्या काळात झालेली नाही. विशिष्ट राजकीय पक्षाच्या राजकीय पक्षांना पुर्वानूभव नसतानाही कंत्राटाची खिरापत केल्याचा आरोप श्री.शिंदे यांनी यावेळी केला.

मुंबईकरांचे मोठे हाल
लॉकडाऊनमुळे त्रस्त मुंबईकरांच्या माथी भरमसाठ अवाजवी बेस्टचे वीज बील मारण्यात आलेले आहे. कोरोना काळात प्रवासाचे साधन नसल्याने अनुपस्थित राहिलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. जनतेच्या सर्वात जास्त संपर्कात येणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणही देण्यात आलेले नाही, याकडे श्री.शिंदे यांनी यावेळी लक्ष वेधले. भाजप प्रदेश प्रवक्ते आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट, मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा, उपनेत्या उज्ज्वला मोडक आणि रिटा मकवाना हे देखील यावेळी उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख