मुंबई : महाभारतात कौरव शिखंडीच्या मागून लढाई करत होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या शिखंडी आहेत आणि आरोपांवर आरोप करत आहेत. फ्रॉड ला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमय्या. वारंवार तक्रारी करायच्या , लोकांना डिस्टर्ब करायचंएवढंच त्यांचं काम आहे, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. अन्वय नाईक प्रकरणात सोमय्यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते किरीट सोमय्यांवर सडकून टीका करत आहेत.
अन्वय नाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराबाबत भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले. शिवसेना व किरीट सोमय्या यांच्या रंगलेल्या वादावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले. ते बिनबुडाचे आरोप करतात, त्यांनी आरोप सिद्ध करावेत, ते आरोप करत राहतील आणि आम्ही त्यांच्या मागे मागे आरोपांवर उत्तर देत बसणार नाही, असे त्या म्हणाल्या.
अन्वय नाईक आणि ठाकरे परिवारामध्ये तीन हजार कोंटीचा जमीन गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच दहीसर, भूखड गैरव्यवहाराबाबत आमच्याकडे कागदपत्रे, पुरावे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. हिम्मत असेल संजय राऊतांनी यावर बोलावं, असं सोमय्या म्हणाले. संजय राऊत मुळ प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कथित घोट्याळ्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. 'भूखंडाचं श्रीखंड करणारे हे सरकार आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवनेना यांच्यात टि्वटवार रंगले आहे. काल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक आणि ठाकरे परिवारात जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत, असा आरोप केला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनीही रिटि्वट करीत भाजपवर निशाणा साधला होता. त्याला शिवसेनेच्या नेत्या डॅा. नीलम गोऱ्हे यांनी उत्तर दिले. काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्यावर 'या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत, शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील "अ" मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मन स्वास्थ चांगले राहते, आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनी च्या वेळेस सगळ्यात आधी आठवते,' असा टोला विधान परिषदेच्या उपसभापती डॅा. नीलम गोऱ्हे यांनी लगावला होता.
Edited By - Amit Golwalkar

