मुंबईच्या महापौर होणार 'सेल्फ क्वारंटाईन' - Mumbai Mayor Kishori Pednekar Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईच्या महापौर होणार 'सेल्फ क्वारंटाईन'

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

किशोरी पेडणेकर यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करुन आपली कोरोनाची चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. आपणाला कोणतीही लक्षणे नसून डाॅक्टरांच्या सल्ल्याने आपण स्वतःच्या घरात क्वारंटाईन होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे

मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना अँटीजेन चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. महापौरांनी स्वतःच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. 

किशोरी पेडणेकर यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करुन आपली कोरोनाची चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. आपणाला कोणतीही लक्षणे नसून डाॅक्टरांच्या सल्ल्याने आपण स्वतःच्या घरात क्वारंटाईन होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या घरातल्यांच कोविड चाचणी करुन घेतली असल्याचेही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे. आपल्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. आपल्या शुभेच्छा व आशिर्वादाने मी लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे. 

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वांद्र्यातील पाली हिल येथील बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत मुंबई महापालिकेने काल नोटीस बजावून बंगला सील केला होता. यातील बांधकामाबाबत कागदपत्रे सादर करण्यास महापालिकेने कंगनाला दिलेली मुदत संपल्यामुळे महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम काल पाडून टाकले. महापालिकेच्या या कारवाईवरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. ही कारवाई मुंबई महापालिकेची होती, शिवसेनेची नाही, असा दावा कार महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. 

याच पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे त्यांनीच सांगितले आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत व शिवसेना यांच्यातले वाक् युद्ध चांगलेच रंगले आहे. कंगनाच्या बंगल्यातले अनधिकृत बांधकाम मनाई आदेश असतानाही पाडून टाकल्याबद्दल उच्च न्यायालयानेही महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. शिवसेनेने हेतुपुरस्सर ही कारवाई केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मात्र, आता महापौरच स्वतः क्वारंटाईन झाल्या आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख