लिंगबदल करून स्त्री झालेला उमेदवार महिला गटातून लढू शकणार - Mumbai High Court Decisssion about Gender Change and Election Process | Politics Marathi News - Sarkarnama

लिंगबदल करून स्त्री झालेला उमेदवार महिला गटातून लढू शकणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 जानेवारी 2021

लिंगबदल करून स्त्री झालेल्या उमेदवारास महिला गटातून ग्रामपंचायत निवडणूक लढण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने  दिली. स्वतःच्या मर्जीने निवडलेल्या लिंगाप्रमाणे राहण्याचा अधिकार तृत्तीयपंथीयांना आहे, असे निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदवले.

मुंबई  : लिंगबदल करून स्त्री झालेल्या उमेदवारास महिला गटातून ग्रामपंचायत निवडणूक लढण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने  दिली. स्वतःच्या मर्जीने निवडलेल्या लिंगाप्रमाणे राहण्याचा अधिकार तृत्तीयपंथीयांना आहे, असे निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदवले.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे अंजली गुरू संजना जान यांनी याचिका केली होती. जळगावमधून ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. महिलांसाठी राखीव असलेल्या गटातून त्यांनी अर्ज केला होता; मात्र त्यांना या गटात अर्ज करता येणार नाही, असे कारण देऊन त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी नामंजूर केला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

याचिकादाराने स्वतःच्या इच्छेने महिला म्हणून जगण्याचे स्वीकारले आहे आणि यापुढेही ती तशाच पद्धतीने राहणार आहे, असे त्यांच्या वतीने अॅड. ए, पी, भंडारी यांनी खंडपीठाला सांगितले. केंद्र सरकारने तृतीयपंथीयांच्या सुरक्षेसाठी कायदा तयार केला आहे. यात त्यांना त्यांच्या लिंगनिवडीचा अधिकार देण्यात आला आहे. याचिकादाराने महिला म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि भविष्यात पुरुष होण्याचा पर्याय स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत महिला म्हणून सहभागी होण्याची परवानगी मिळू शकते, असे न्या. रवींद्र घुगे यांनी निकालात स्पष्ट केले. तसेच निवडणूक अधिकाऱ्याचा अर्ज नाकारण्याचा निर्णयही त्यांनी रद्द केला आणि उमेदवारी अर्ज मान्य केला.    

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख