मुंबई भाजप : शीतल देसाई महिला मोर्चा अध्यक्ष; तेजिंदरसिंह तिवाना युवा मोर्चा अध्यक्ष - Mumbai BJP Announces Executive Committee | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई भाजप : शीतल देसाई महिला मोर्चा अध्यक्ष; तेजिंदरसिंह तिवाना युवा मोर्चा अध्यक्ष

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी काल या टीम मधील ३२ जणांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना तसेच काँग्रेस यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी मुंबई भाजप च्या टीम मध्ये हे बदल करण्यात आले.

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महिला मोर्चा अध्यक्षपदी माहीम येथील नगरसेविका शीतल देसाई यांची  नियुक्ती करण्यात आली. तर मुंबई युवा मोर्चा अध्यक्षपदी तेजिंदरसिंह तिवाना यांची पुन्हा नियुक्ती झाली. आमदार सुनील राणे व अमित साटम यांना महामंत्री करण्यात आले आहे. 

पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी काल या टीम मधील ३२ जणांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना तसेच काँग्रेस यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी मुंबई भाजप च्या टीम मध्ये हे बदल करण्यात आले. या नियुक्त्या तीन वर्षांसाठी असल्याने महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांची असेल.  

आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या. गेले वर्षभर युवा मोर्चाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तिवाना यांनी आतापर्यंत युवा मोर्चातर्फे चिनी मालावर बहिष्कार, मेट्रो ला उशीर होत असल्याविरोधात आंदोलन आदी अनेक आंदोलने केली आहेत. तर नगरसेविका म्हणून भरीव कामगिरी केलेल्या श्रीमती देसाई यांनीही नुकतेच महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या आंदोलनाचे तसेच सिद्धिविनायक मंदिर खुले करण्याच्या आंदोलनाचे आयोजन केले होते. उत्तर भारतीय मोर्चाच्या मुंबई अध्यक्षपदी जयप्रकाश सिंह यांची नेमणूक झाली. अल्पसंख्य सेल चे प्रमुख वासिम खान तर एससी मोर्चा आघाडीचे प्रमुख शरद कांबळे असतील. 

मुख्य कार्यकारिणीवर मुंबईतील पक्षाचे तीनही खासदार, मुंबईतील विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे प्रमुख आमदार व मुख्य नेते आहेत. कार्यकारिणीवर किरिट सोमैय्या, प्रकाश मेहता, रमेशसिंह ठाकूर, दिलीप पटेल यांचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नारायण राणे, रेल्वेमंत्री पियूष गोयल, माधव भंडारी, जाफर इस्लाम, माजी मंत्री विनोद तावडे हे कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित आहेत.

बोरीवलीचे आमदार सुनील राणे, अंधेरीचे (पश्चिम) आमदार अमित साटम यांच्यासह संजय उपाध्याय हे महामंत्री तर योगेश सागर, पराग अळवणी, कॅप्टन तमिल सेल्वन, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर  यांच्यासह एकूण तेराजण उपाध्यक्ष आहेत. ज्ञानमूर्ती शर्मा, विनोद शेराल यांच्यासह १३ मंत्री व सात प्रवक्त्यांचीही नियुक्ती करण्यात आली.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख