मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या सराफाला ७५ वर्षीय लेखिकेचा हिसका

मराठीत बोला अशी मागणी केल्याने मुंबईतील कुलाबा भागातल्या महावीर ज्वेलर्स मालकाने आपल्याला ढकलून दिलं असा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलनही पुकारले होते.
MNS Supporting Women Writer on Marathi Speaking issue
MNS Supporting Women Writer on Marathi Speaking issue

मुंबई : मराठीत बोला अशी मागणी केल्याने मुंबईतील कुलाबा भागातल्या महावीर ज्वेलर्स मालकाने आपल्याला ढकलून दिलं असा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलनही पुकारले होते. गुरुवारी दुपारपासून या लेखिका कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सबाहेर येऊन बसल्या होत्या. दरम्यान, या दुकानाच्या मालकाने शोभा देशपांडे यांची माफी मागितली आहे. 

या प्रकरणी मनसेही आक्रमक झाली होती. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सकाळी शोभा देशपांडे यांची भेट घेतली. महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटत असेल तर आम्ही आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. पोलिस या दुकानदाराला घेऊन जात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपही दिला. दरम्यान, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही शोभा देशपांडे यांची भेट घेऊन मराठीच्या मुद्द्यावर लढल्याबद्दल कौतुक केले. 

काल रात्रीपासून आंदोलन करणाऱ्या लेखिकेचे नांव शोभा रजनीकांत देशपांडे आहे. मराठीत बोलण्याचा आग्रह धरल्याने महावीर ज्वेलर्स या दुकानदाराने आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली आणि दुकानाबाहेर ढकलून दिले असा त्यांचा आरोप आहे.

त्या एक वृत्तपत्रही चालवत होत्या. त्यांचे पती भारतीय नौदलात होते. शोभा देशपांडे या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी लढा देत आहेत. शोभा देशपांडे यांनी थरारक सत्य इतिहास आणि इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू या दोन पुस्तकांचं संकलन केलं आहे. 

गुरुवारी दुपारी शोभा देशपांडे कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिला आणि दागिने देण्यासही नकार दिला. दुकानदाराने आपल्याला पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला आहे.

ज्वेलर्स दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केला आहे. त्यामुळे ज्वेलर्स दुकानदारावर जोवर कारवाई होत नाही तोवर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करणार आहे असे त्यांनी जाहीर केले. सराफ आणि पोलीस या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शोभा देशपांडे यांनी केली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या असेल्या मुंबई शहरात मराठी भाषेचा अपमान होत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी मला कोणत्या अधिकाराने हात लावला? महिला पोलीसही मराठी होत्या त्यांनी मला ढकललं त्याचं मला वाईट वाटलंच शिवाय त्या दोघीही मुद्दामहून दुकानदाराशी हिंदीतून बोलत होत्या, असाही आरोप त्यांनी केला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com