Manisha Kayande HIts out at Narayan Rane over Uddhav Thackeray Remarks | Sarkarnama

राणेंनी योग्य माहिती घेऊन विधाने करावीत; शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा टोला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 जुलै 2020

मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडत नसल्याबाबत भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे

मुंबई : मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडत नसल्याबाबत भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सर्वत्र उपस्थिती लावीत असल्याने, राणे यांनी योग्य माहिती घेऊन विधाने करावीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

''आज संपूर्ण देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या म्हणजेच ऑनलाईन माध्यमातून काम करीत आहे. मुख्यमंत्री ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील सर्व मंत्री वेबिनार, ऑनलाईन परिसंवाद-बैठका आदी दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रम करीत आहेत व कामे मार्गी लावीत आहेत. ऑनलाईन पद्धतीने संवाद साधण्याची जनतेचीही तयारी झाली आहे व महाविकास आघाडी सरकारदेखील याच माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवीत आहेत,'' असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.

''जिथे प्रत्यक्ष उपस्थितीची गरज आहे तेथे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रीदेखील प्रत्यक्ष उपस्थित राहून जनतेला धीर देण्याचे काम करीत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी आघाडी सरकार योग्य ती सर्व पावले उचलीत आहेत. त्यामुळे राणे यांनी अचूक माहिती घेऊनच पत्रकार परिषदा घ्याव्यात,'' असा टोलाही कायंदे यांनी लगावला आहे. 

''राज्यात कोरोनावर नियंत्रण न येण्यामागे ठाकरे यांची निष्क्रीयता कारणीभूत असल्याची टीकाही राणे यांनी केली होती. त्याचाही श्रीमती कायंदे यांनी समाचार घेतला आहे. अजूनही जगात व देशात कोरोनाचा फैलाव आटोक्यात येत नसताना महाराष्ट्र सरकारने सोशल डिस्टन्सिंचे पालन करीत जून महिन्यात अनलॉकिंग सुरु केले. यानुसार योग्य ती काळजी घेत उद्योगधंदे व आवश्यक व्यवहार सुरु झाले. तर जेथे कोरोनाचा फैलाव जास्त आहे तेथे अजूनही लॉकडाऊन सुरूच आहे. आज देशात सर्वत्र कोरोना नियंत्रणासाठी धारावी आणि वरळी पॅटर्नची चर्चा सुरु असून केंद्र सरकारनेसुद्धा राज्यातील आरोग्य यंत्रणांची पाठ थोपटली आहे. त्यामुळे राणे यांची टीका अनाठायी असल्याचे दिसते," असेही कायंदे यांनी म्हटले आहे.

संपादन - अमित गोळवलकर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख