Maharashtra Govenment Increased Honorarium of Asha Workers | Sarkarnama

अमित ठाकरेंची 'ही' मागणी केली अजित पवारांनी मान्य

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 जून 2020

राज्यातील सर्व आशा भगिनीच्या मानधनात २ हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात ३ हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी शासनाकडे हे मानधन वाढवण्याची मागणी केली होती.

मुंबई : राज्यातील सर्व आशा भगिनीच्या मानधनात २ हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात ३ हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी शासनाकडे हे मानधन वाढवण्याची मागणी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या मागणीसाठी अमित ठाकरे यांनी अजित पवार यांची मंत्रालयात भेटही घेतली होती. शासनाने यासाठी १५७ कोटी ७० लाखांची तरतूद करुन दिली आहे. 

राज्यातील आशा स्वयंसेविकांना सध्या मिळणारे मानधन म्हणजे एक प्रकारेच त्यांचे आर्थिक शोषणच आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत हे मानधन अतिशय तुटपुंजे आहे. या स्वयंसेविकांना सन्मानजनक मानधन मिळाले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून केली होती. आता शासनाने या मानधनात वाढ केली आहे. 

राज्याच्या आरोग्य खात्याच्या अंतर्गत 'राष्ट्रीय आरोग्य अभियान' मध्ये शहर व ग्रामीण भागातून ७२ हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. राज्याच्या काना-कोपऱ्यात या आशा स्वयंसेविका सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.  कोरोनाचा सामना करणाऱ्या डॉक्‍टरांच्या वेतनाचा प्रश्‍न चुटकीसरशी सोडवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आशा सेविकांचे एकमेव आशास्थान ठरले होते. मानधनासह अन्य प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी 'कृष्णकुंज'वर धाव घेतली होती. कोरोनाच्या संकट काळात आशा स्वयंसेविकांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मात्र तुटपुंज्या मानधनासह इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी आशाच्या शिष्टमंडळाने अमित यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. तसेच, आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते, अशी भावनाही व्यक्त केली होती. 

आशा सेविकांना आत्मसन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी त्यांना लवकरात लवकर दहा हजार रुपये मानधन कसे देता येईल, याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा व राज्यातील आशा गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन द्यावे व हा निर्णय महापालिका स्तरावर न घेता संपूर्ण राज्य स्तरावर घेतला जावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे केली होती. कोरोनाच्या काळात या आशा सेविकांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना विशेष भत्ता जाहीर करावा, असेही अमित ठाकरे यांनी शासनाला लिहिले होते. अमित ठाकरे यांची पूर्ण नाही तर काही प्रमाणात मागणी शासनाने मान्य केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख