Kangana Leaves Mumbai | Sarkarnama

जड अंतःकरणाने मुंबई सोडतेय : कंगनाचे ट्वीट

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

रक्षकच भक्षक बनून लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत. मला कमजोर समजून त्यांनी मोठी चूक केली आहे. एका महिलेला धमकावून त्यांनी स्वतःची इमेज धुळीला मिळवली आहे,' अशा शब्दात कंगना राणावतने शिवसेनेवर टीका केली आहे

मुंबई : मी अत्यंत जड अंतःकरणाने मुंबई सोडते आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर सतत शाब्दिक हल्ले करुन दहशत माजवली गेली, माझे घर उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, मला सशस्त्र सुरक्षा घ्यावी लागली ते पाहता हे सारे पाकिस्तान व्याप्त काश्मीरप्रमाणेच होते असे म्हणावे लागेल, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावतने केले आहे. पाच दिवसांनंतर कंगना पुन्हा मनालीला रवाना झाली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राणावत ही भलतीच आक्रमक झाली आहे. तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरवात केली. सुशांतचा बळी घराणेशाहीनेच घेतला आणि सामान्य कुटुंबातील तरूणांना येथे यशस्वी होता येत नाही असे तिचे ठाम म्हणणे आहे. तसेच कंगणाने शिवसेनेशी पंगा घेतला आहे. मुंबई पोलिसांची सुरक्षा नाकारत कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केल्याने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत आणि कंगनामध्ये तर दररोज आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. 

मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. कंगनाच्या कर्मचाऱ्यांनी नोटीस न स्वीकारल्याने बंगल्याच्या दर्शनी भागी ती लावण्यात आली होती. बंगल्यात झालेल्या कामाच्या परवानगीची कागदपत्रे २४ तासांत सादर करण्याची मुदत यामध्ये तिला देण्यात आली आहे. तिने 24 तासांत पुरावे सादर न केल्यास पालिका हे बांधकाम बेकायदा ठरवून तोडू शकते, असा इशारा देण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर महापालिकेचे पथक बुलडोझर घेऊन कंगनाच्या बंगल्यावर गेले. पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत भाग हातोडा आणि बुल़डोझरच्या सहाय्याने पाडून टाकला, त्यावरुनही वादळ उठले आहे.

संबंधित लेख