मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते..राठोडांचा राजीनामा घ्या - Chitra Wagh Request to Uddhav Thackeray to Take Sanjay Rathod's Resignation | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते..राठोडांचा राजीनामा घ्या

तुषार रुपनवर
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

मी विरोधी पक्षात आहे पण मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, असे आवाहन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी 'साम टिव्ही'च्या माध्यमातून केले. 

मुंबई : संजय राठोड यांनी पूजा चव्हाण ला तब्बल ४५ काॅल केले आणि हे काॅल पुजाच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनला दिसत आहे. मी विरोधी पक्षात आहे पण मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, असे आवाहन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी 'साम टिव्ही'च्या माध्यमातून केले. 

टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात वन राज्यमंत्री संजय राठोड हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विशेषतः चित्रा वाघ अत्यंत आक्रमकपणे राठोड यांच्या विरोधात बोलत आहेत. "पूजा चव्हाण प्रकरणात कुणाला वाचविण्याचे आदेश दिले जात आहेत, पोलिस अॅक्शन मोडमध्ये का येत नाही, आदी प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत. चित्रा वाघ यांनी पूजा राहत असलेल्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ही शिवशाही आहे की मोगलाई, हे तुमच्या कृतीतून दिसू द्या," असे आवाहन वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले असून. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांना निलंबित करा, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात घेण्यात येत असलेले नांव आणि त्यानंतर अज्ञातवासात राहून नंतर पोहरादेवी येथे केलेले शक्तीप्रदर्शन यामुळे वन राज्यमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत आले आहेत. आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विदर्भातल्या शिवसैनिकांनी एकजूट करायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा घ्यावा, यासाठी आता विदर्भातील शिवसैनिकांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विदर्भातले शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राठोडांमुळे विदर्भात पक्षाचे काम करणे कठीण होत असल्याची या लोकप्रतिनिधींची भावना असून ती हे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. एका बाजूला राठोडांनी राजीनामा द्यावा, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून दबाव आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार खासदारही पक्षावर दबाव आणण्याची शक्यता आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख