झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका महापौरांनी ढापल्या - सोमय्यांचा पुन्हा आरोप - BJP Ex MP Kirit Somaiya Allegation on Mumbai Mayor Kishori Pednekar | Politics Marathi News - Sarkarnama

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका महापौरांनी ढापल्या - सोमय्यांचा पुन्हा आरोप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

गोमाता नगर वरळी येथील गरीब झोपडपट्टीवासियांसाठी राखीव ठेवलेल्या अर्धा डझन सदनिका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ढापल्या आहेत, त्यांची हकालपट्टी व्हायला हवी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे

मुंबई : गोमाता नगर वरळी येथील गरीब झोपडपट्टीवासियांसाठी राखीव ठेवलेल्या अर्धा डझन सदनिका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ढापल्या आहेत, त्यांची हकालपट्टी व्हायला हवी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. यापूर्वीही सोमय्या यांनी महापौर पेडणेकर यांच्यावर आरोप केला आहे. महापौरांवर ४८ तासात जर कारवाई झाली नाही तर मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे मी बेमुदत धरणे आंदोलन करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परळच्या गोमाता नगर इमारत क्रमांक-२ मधील ६०१ क्रमांकाचा फ्लॅट हडप केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी याआधी केला होता. या फ्लॅटमध्ये महापौरांनी त्यांचं कार्यालय थाटले होते आणि त्याबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली होती, असा दावा करतानाच सोमय्या यांनी महापौरांचं शपथपत्रंच जाहीर केले होते . हा फ्लॅट झोपडपट्टी पूनर्वसनातील लोकांसाठी राखीव आहे. महापौरांच्या कुटुंबीयांसाठी नाही, असे सोमय्या यांनी त्यावेळी म्हटले होते. 

त्यावेळी महापौर पेडणेकर यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. भाजपने हवेत आरोप करू नये, त्यांनी आरोप सिद्ध करावेत. हवी ती शिक्षा भोगेन, असे आव्हान  महापौर पेडणेकर यांनी दिले होते.  तर मी फ्लॅट लाटला हे सिद्ध करा. चुकीचे आरोप करू नका. एका महिलेवर आरोप करताना लाज वाटत नाही का?, अशा शब्दात महापौर पेडणेकर यांनी सोमय्या यांना फटकारले होते. आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी महापौरांवर आरोप केला आहे. 

वरळी येथील गोमाता जनता 'एसआरए'च्या जागेचा गैरव्यवहार करणा-या महापौर किशोरी पेडणेकर ताबडतोब कारवाई व्हावी, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी बी एम सी आणि एस आर ए कडे आम्ही केली आहे. पुरावे ही सादर केले आहे. ४८ तासात कार्यवाही झाली नाही तर मी महापालिका समोर आंदोलन करु, असे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख