अभिनेत्री कंगना राणवतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून Y श्रेणी संरक्षण? - Actress Kangana Ranaut Provided Y Catagory Security by Central Home Ministry | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनेत्री कंगना राणवतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून Y श्रेणी संरक्षण?

वृत्तसंस्था
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सातत्याने आवाज उठवणारी अभिनेत्री कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. कंगना येत्या ९ तारखेला मुंबईला येत आहे. शिवसेना नेत्यांकडून कंगनाला मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सातत्याने आवाज उठवणारी अभिनेत्री कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. कंगना येत्या ९ तारखेला मुंबईला येत आहे. शिवसेना नेत्यांकडून कंगनाला मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्या अतीमहत्त्वाच्या व्यक्तींना पुरवली जाते. यात कमांडोंसह एकूण अकरा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. संबंधित व्यक्तीला दोन व्यक्तीगत सुरक्षा रक्षकही पुरवले जातात. 

कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून कंगनावर टीका केली होती. कंगनाला सुरक्षित वाटत नसेल तर तिने मुंबईत येऊच नये, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. अन्य काही शिवसेना नेत्यांनीही कंगनाला उद्देशून धमकीवजा वक्तव्ये केली होती. त्यानंतर काल कंगनाने संजय राऊत यांना आव्हान देत आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहोत, असे आव्हान दिले. 

कंगनाने ट्वीट करुन आपल्याला सुरक्षा पुरविल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. "आता कुणा देशभक्ताचा आवाज कुणी दाबू शकणार नाही, हे सिद्ध झाले आहे. अमित शहा मला मुंबईला जाणे पुढे ढकलण्याचा सल्ला देऊ शकले असते. पण त्यांनी भारताच्या कन्येचा मान राखला. आमचा स्वाभीमान आणि आत्मसन्मानाची लाज राखली. मी अमित शहा यांची आभारी आहे," असे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, एक नारी शिवसेना पर भारी...असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना व विशेषतः खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता राजकीय विवाद सुरु झाले आहेत. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख