केंद्रीय मंत्री नारायण राणे ताकद दाखवणार; कोकणात २० पासून जन आशीर्वाद यात्रा

राणे हे आपले पारंपारिक राजकीय विरोधक शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे ताकद दाखवणार; कोकणात २० पासून जन आशीर्वाद यात्रा
Union Minister Narayan Rane to visit Konkan from August 20

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे येत्या 20 ऑगस्ट रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्‍यानंतर नारायण राणे यांचा हा पहिलाच कोकण दौरा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राणे मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती आज भाजप कार्यालयातून देण्यात आली. (Union Minister Narayan Rane to visit Konkan from August 20)

दरम्यान, मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेता या यात्रेची सुरुवात मुंबईतून करण्यात येणार आहे. मुंबईतील राणे यांच्या ताकदीचा फायदा आगामी निवडणुकीत  भाजप फायदा घेणार आहे. या संपूर्ण जन आशीर्वाद यात्रेत राणे हे आपले पारंपारिक राजकीय विरोधक शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.  

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे 19 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. ते 20 ऑगस्ट रोजी मुंबई उपनगरातून जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ करणार आहेत. ता. 21 ऑगस्ट रोजी वसई-विरार येथे ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार आहे. ता. 23 ऑगस्टला दक्षिण रायगड जिल्ह्याच्या दौऱ्‍यावर नारायण राणे व जन आशीर्वाद यात्रा रवाना होणार आहे. या दिवशी रात्री चिपळूण शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुक्काम असणार आहे. 

ता. 24 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने यात्रा रवाना होणार आहे. त्यानंतर ता.  25 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यानंतर केंद्रीय मंत्री राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री दाखल होणार आहेत. कणकवली येथील ओम गणेश निवास स्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. ता. 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा असणार आहे. 

या वेळी या संपूर्ण दौर्‍यात भाजपाचे विविध स्तरातील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी केंद्रीय मंत्री नारायण राणे घेणार आहेत. या संपूर्ण जन आशीर्वाद यात्रेच्या दौर्‍यात मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत यात्रा प्रमुख म्हणून माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांच्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे. संयोजक म्हणून आमदार संजय केळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.